महापालिका निवडणुका जवळ आल्यावर पुन्हा आंदोलनाची हाक देणाऱ्या राज ठाकरे यांना नेटिझन्सनी गुरुवारी खडे बोल सुनावले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी मुंबईत केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांवर येणाऱ्या नव्या रिक्षांचा मुद्दा मांडला होता. त्याचबरोबर या रिक्षा रस्त्यावर दिसल्यानंतर त्यातील प्रवाशांना आणि चालकाला खाली उतरवून त्या जाळून टाकण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. नव्या रिक्षा जाळण्यास सांगितल्यानंतर षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या असल्या तरी हिंसक कृतीची चिथावणी देणाऱ्या वक्तव्याचा समाजातून निषेध होतो आहे. नेटिझन्सनीही राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा विरोध करीत त्यांना महापालिका निवडणुका जवळ आल्यानंतरच मराठी माणसाची आठवण कशी होते, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या मनसेने आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि भाजपने निवडणूक कशी जिंकली यावर विचार केला पाहिजे, असे नेटिझन्सनी सांगितले. लुंग्या सोडण्याचा, दुकाने जाळण्याचा काळ गेला, असेही प्रसाद नावाच्या व्यक्तीने म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणावर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया
खरे की खोटे जनतेला कसे कळणार? निवडणूक आली की तुम्हाला मराठीचा पुळका येतो – अनिल गुढेकर
शहरातली लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली त्याप्रमाणात नवीन रिक्षा परवाने देऊन जास्तीच्या रिक्षा रस्त्यावर आल्याच पाहिजे. म्हणजे इकडे नाही येणार, तिकडे नाही जाणार, रिक्षाची वाट पाहून उशीर होणे आदी प्रकार थांबतील. जास्तीच्या रिक्षा म्हणजे स्पर्धा वाढून मिळेल ते भाडे रिक्षावाले मारतील. नाहीतर उपाशी बसायला लागेल. वाहतुकीची कोंडी होईल पण त्यासाठी फेरीवाले, अतिक्रमणे हटवून गर्दीची ठिकाणे मोकळी करा. रिक्षा कशाला जाळता? मागे टोल नाके जाळले, किती फरक पडला? – गावकरी
अरे राज ठाकरे, हिंसे शिवाय तुला काही दुसरे येत नाही का. निदान ग्राम पंचायतीची निवडणूक तरी लढव आणि एका गावाचा कारभार ५ वर्षे सुरळीत चालवून दाखव. कृपया उंटावरून शेळ्या हाकू नकोस. – जीवन गोगटे
हजारो कोटी बुडवून श्रीमंत माणसं परदेशात पळतात कसे? किंगफिशरचे कार्यालय जाळायची हिम्मत आहे? रिक्षा जाळायची भाषा करताय, लाच घेणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांना बडवायची हिम्मत आहे? – प्रसाद
महाराष्ट्रात जे परवाने देण्यात आले ते भारतीयांनाच दिले आहेत आणि त्यासाठी त्यानी योग्य मार्ग अवलंबला आहे. लाच घेऊन जर परवाने देण्यात आले असतील तर परवाने देणाऱ्यांवर कारवाई करावी पण रिक्षा जाळा असे आदेश देणे हे अयोग्य आहे. या विध्वंसकाला तुरुंगातच पाठवले पाहिजे. – कोळसाट