केंद्रीय रसायन व खते मंत्री अनंत कुमार यांची माहिती; मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती शक्य

राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात चांगल्या प्रतीची औषधे मिळावीत यासाठी केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्रात शंभर जनऔषधी केंद्रे उभारण्यासाठी राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून येत्या सहा महिन्यांत ही केंद्रे सुरू होतील, अशी माहिती केंद्रीय रसायन व खते मंत्री अनंत कुमार यांनी सोमवारी येथे दिली.

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री अनंत कुमार, राज्यमंत्री हंसराज अहिर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज सह्य़ाद्री अतिथीगृहात राज्यातील विविध विषयांवर बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत असताना केंद्राने राज्यासाठी विविध प्रकल्पांची भेट दिली असून त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात या वर्षांत तीन हजार जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचे घोषित केले आहे. त्यातील शंभर जनऔषधी केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत. या संदर्भात लवकरच राज्य व केंद्र शासन यांच्यात करार करण्यात येणार असल्याचे अनंत कुमार यांनी यावेळी सांगितले.या केंद्रांमध्ये सुमारे विविध ६०० जेनेरिक औषधे व १५० इतर साहित्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याची किंमत ही बाजारभावापेक्षा कमी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, महानगरपालिकांची रुग्णालये तसेच सार्वजनिक ठिकाणी ही जनऔषधी केंद्रे उभारण्यात येणार असून त्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध होतील. या केंद्रासाठी राज्य शासन जागा उपलब्ध करून देईल. तसेच राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये शंभर टक्के जेनेरिक औषधांचा पुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.