आरामदायक प्रवासासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या नवीन बंबार्डियर गाडय़ा पश्चिम रेल्वेवर मार्चअखेपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांनी वर्तवली. नवीन बंबार्डियर गाडय़ांपैकी दोन गाडय़ा नुकत्याच पश्चिम रेल्वेवर दाखल झाल्या असून सध्या त्यांचे परीक्षण चालू आहे. याआधीही पश्चिम रेल्वेवरच एक नवीन गाडी आली होती. आता मार्चअखेपर्यंत या गाडय़ा प्रत्यक्ष सेवेत येणार आहेत. येत्या वर्षभरात या नव्या ७५ गाडय़ांचा ताफा उपनगरीय रेल्वे सेवेत दाखल होणार आहे. या गाडय़ा मध्य आणि पश्चिम या दोनही मार्गावर चालतील. मात्र या गाडय़ा फक्त एसी विद्युतप्रवाहावर चालणार असल्याने या गाडय़ांचे परीक्षण सध्या पश्चिम रेल्वेमार्गावरच केले जात आहे. मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यादरम्यान डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाल्यानंतरच या गाडय़ा  तेथे चालवणे शक्य होणार आहे.