वांद्रे टर्मिनस स्थानकातून बेपत्ता झालेल्या एका नववधूला वांद्रे रेल्वे पोलिसांनी शोधून काढले खरे. पण ती बेपत्ता झालेली नव्हती तर स्वत:च्या मर्जीनेच पळून गेली होती, हे कळल्यानंतर त्यांना धक्काच बसला. लग्नामुळे थांबलेले उच्च शिक्षण घेण्यासाठी गोव्याला जायचे म्हणून ही नववधू पळून गेली होती.
सुनीता (नाव बदललेले) या तरुणीचे गुजरातेतील वरुण नावाच्या व्यक्तीशी  फेब्रुवारीतच लग्न झाले होते. तर सुनीताच्या बहिणीचेही वरुणच्या भावाशी लग्न झाले होते. हे दोन्ही विवाह एकत्रच झाले होते. लग्नानंतर सगळे कुटुंब मुंबई फिरण्यासाठी आले होते. दोन मार्च रोजी ते सौराष्ट्र एक्सप्रेसने राजकोटला परत जाणार होते. मात्र त्याच वेळी वांद्रे टर्मिनस स्थानकात वरुणची आई गर्दीत हरविली. सुनीता आपल्या सासूचा शोध घेण्यासाठी गेली ती परतलीच नाही. सासू सापडली पण सून बेपत्ता झाली. त्यामुळे वरुणने वांद्रे रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. इस्थर अनुह्या प्रकरणाचा धडा घेतलेल्या पोलिसांनी त्वरीत हालचाली सुरू केल्या.
पोलिसांनी वांद्रे टर्मिनसमधील सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यात सुनीता मोबाईलवर बोलत बाहेर जात असताना दिसली.
पोलिसांनी तेथील रिक्षा चालकांची चौकशी केली असता त्यातील अबरार मन्सुरी या रिक्षाचालकाने सुनीताला रिक्षातून गोरेगावला सोडल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी सुनीताच्या मोबाइलवरून केलेला शेवटचा कॉल तपासला. तो गोरेगाव येथील मयंक नावाच्या व्यक्तीला केल्याचे समोर आले. पोलिसांनी या मयंकचा पत्ता शोधला. पण त्याने चार महिन्यांपूर्वीच घर विकले होते. त्याचा नंतरचा पत्ता कुणाकडेच नव्हता. मग पोलिसांनी मयंकच्या फोनवर लक्ष ठेवले आणि तो ओशिवरा परिसरात असल्याची माहिती टॉवर लोकेशनवरून काढली. तेथे सापळा लावला असता सुनीता आणि मयंक दोघेही सापडले.

फॉरेन्सिक सायन्सच्या अभ्यासासाठी..
सुनीता मूळ मध्यप्रदेशातील आहे. तिने एमएस्सी, एमएडचे शिक्षण घेतले होते. तर तिचा पती बारावी शिकलेला होता. तिला गोव्यात फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यासक्रम करायचा होता. सासरचे लोक करू देणार नाहीत, म्हणून तिने बालपणीचा मित्र मयंक याच्या मदतीने शिक्षणासाठी गोव्याला जाण्याची योजना बनवली होती. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पडवी, पिंपळे, पोलीस उपनिरीक्षक तायरे, चव्हाण आदींच्या पथकाने लावल्याची माहिती वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश पडवी यांनी दिली.