‘पुनश्च: हरिओम’ होत असताना गर्दीच्या नियोजनासह कायदा व सुव्यवस्थेचेही प्रश्न

मुंबई : टाळेबंदी शिथील करून मुंबईचे जीवनमान पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांत पोलिसांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. सव्वादोन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर शुक्र वारी मुंबईतील सर्वप्रकारची दुकाने, बाजारपेठा अटी-शर्थीवर खुली होणार आहेत. ‘पुनश्च हरिओम’चा हा महत्वाचा टप्पा असून यातील नियमांची अंमलबजावणी, गर्दीच्या नियोजनासह गुन्हेगारी वाढू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच्या उपाययोजना पोलिसांच्या खांद्यावर असतील.

टाळेबंदी शिथिल करताना आठवडय़ातील प्रत्येकी तीन दिवस रस्त्याच्या कोणत्या बाजूची दुकाने सुरू ठेवावी, याची आखणी महापालिकेच्या विभाग कार्यालयांमधून होणार असली तरी, या नियमांचे पालन होतेय की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. दुकानांत किंवा रस्त्यांवर उसळणारी गर्दी आणि त्याचा गैरफायदा घेत होणारे गुन्हे रोखण्याची जबाबदारीही पोलिसांवर असणार आहे.

स्थलांतरित श्रमिकांना आपापल्या गावी पाठवण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने पोलीस ठाण्यांवरील ओझे काही प्रमाणात हलके झाले आहे. मात्र, टाळेबंदी शिथिल होत असताना पोलिसांना अधिक काटेकोरपणे बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. शुक्र वारपासून शिथिल होणाऱ्या टाळेबंदीसाठी पोलीस दल सज्ज असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. शुक्र वारी होणारी गर्दी पाहून उपाययोजनांमध्ये योग्य ते बदल के ले जातील, अशी प्रतिक्रि या पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी व्यक्त केली.

गुन्हेगारीचे आव्हान

गेल्या दोन महिन्यात रोडावलेली रस्त्यांवरील गुह्य़ांचे(स्ट्रीट क्रोईम) प्रमाण शुक्र वारनंतर वाढू लागेल. यात सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, घरफोडी किं वा वाटमारीसारखे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. ते रोखण्यासाठी बंदोबस्त, गस्त वाढवणे आदी उपाययोजना कराव्या लागतील. टाळेबंदी काही प्रमाणात शिथील झाली असली तरी वाहतुकीवरील निर्बंध कायम असून त्यासाठी के लेल्या उपायोजनांपासून पोलिसांची सुटका झालेली नाही.

अपुरे मनुष्यबळ

आधीच अपुरे असलेल्या पोलीस मनुष्यबळाला करोनामुळे आणखी गळती लागली. त्यात पन्नाशी उलटलेल्या आणि आजारी पोलिसांना करोना सहज होऊ शकतो म्हणून घरीच थांबण्याच्या सूचना आहेत. उर्वरित मनुष्यबळाला आराम मिळावा यासाठी १२ तासांच्या एका पाळीत कर्तव्य बजावल्यानंतर २४ तास आराम दिला जात आहे. या वेळापत्रकामुळेही प्रत्येक पाळीत निम्म्याहून कमी मनुष्यबळ पोलीस ठाण्यात उपलब्ध असते. त्यामुळे पोलिसांवरला ताण वाढणार हे निश्चित असल्याची प्रतिक्रि या एका अधिकाऱ्याने व्यक्त के ली.

छत्री-रेनकोट-शालेय वस्तूंसाठी गर्दी

टाळेबंदी शिथिल होताच सर्वप्रथम छत्री, रेनकोट, पावसाळी पादत्राणे तसेच शालेय साहित्य यांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याखेरीज कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरण्े आणि मोबाइलशी संबंधित वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची झुंबड उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.