ठाण्याच्या प्रस्तावित ‘किनारपट्टी व्यवस्थापन आराखडय़ा’नुसार खाडी किनाऱ्यालगतच्या बांधकामांसाठी अटी शिथिल होणार असल्याची चाहुल लागताच भूमाफियांनी आत्तापासूनच खाडीत भराव टाकून जमिनी विकसित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील खारफुटीचे आणि पर्यायाने खाडीचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादानेच हा सगळा प्रकार चालल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.
ठाण्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र यापूर्वीचा आराखडा ढोबळमानाने आखणी करून लागू करण्यात आला होता. त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील खारफुटीपासून ५० मीटरचा बफर झोन तर त्यापुढे १०० मीटर सीआरझेड, आणि ज्या ठिकाणी खारफुटी नाही तेथे पूररेषेपासून दीडशे मीटर क्षेत्रात बांधकामांना मज्जाव होता. मात्र याबाबतचे सुस्पष्ट नकाशे नसल्यामुळे सरसकट अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे सीआरझेड लागू केला जात असे. परिणामी खाडी किनारा परिसरातील वसाहतींना त्याचा फटका बसत असे. मात्र आता नव्याने निर्माण होणाऱ्या नकाशामुळे खाडी किनाऱ्यालगतचे ५० मीटर क्षेत्र बांधकामासाठी खुले होणार आहे. नेमका याचाच फायदा घेत गेल्या काही महिन्यापासून ठाण्यातील भूमाफियांनी कोपरी, कळवा, मुंब्रा, साकेत, बाळकूम, कोलशेत या खाडी किनारी भराव टाकून जमीन विकसित करण्याचा उद्योग सुरू केला आहे.
ठाणे पूर्व भागातील खाडी किनारी असलेल्या स्वामी समर्थ मठाच्या परिसरात राजरोसपणे भराव टाकून खारफुटींची कत्तल केली जात आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने या खारफुटीवर ट्रकच्या ट्रक रॅबीटचा भराव टाकला जात आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे खाडी किनारी भराव टाकून त्यावर चाळी बांधण्यात आल्या असून त्यांना महापालिकेने सर्व सुविधाही दिल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे खारफुटी नष्ट करून तेथे जमीन निर्माण करण्याचे उद्योग सुरू आहेत. त्याबाबत महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्याने हतबल झालेल्या स्थानिक रहिवाशांनी स्थापन केलेल्या दक्षता मंचाच्या माध्यमातून अखेरचा पर्याय म्हणून थेट पर्यावरण विभागाकडे तक्रार केली आहे.