05 March 2021

News Flash

भटक्या प्राण्यांवरील दयेचा जाच!

श्वानांच्या विष्ठेमुळे मरिन ड्राइव्हसह मुंबईतील अनेक भागांतील रस्ते, पदपथ अस्वच्छ होत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

रस्त्यावरील श्वानांना खाऊ घालण्याच्या सवयीमुळे नवीन वाद

रस्त्यावर वा सार्वजनिक ठिकाणी फेरफटक्याच्या निमित्ताने आणलेल्या पाळीव प्राण्यांच्या मलमूत्र विसर्जनामुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण होत असतानाच रस्त्यावरील भटकी कुत्री तसेच मांजरी वा अन्य प्राण्यांना खाऊ घालण्याच्या काही नागरिकांच्या सवयीचाही आता त्रास होऊ लागला आहे. प्राणिमात्रांवर दया करण्याच्या भावनेने हे प्रकार सुरू असले तरी, त्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता पसरण्यासोबतच भटक्या प्राण्यांचा उपद्रवही वाढू लागल्याने अनेक ठिकाणी नागरिकांत वाद निर्माण होऊ लागले आहेत.

श्वानांच्या विष्ठेमुळे मरिन ड्राइव्हसह मुंबईतील अनेक भागांतील रस्ते, पदपथ अस्वच्छ होत आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करताच मुंबई महापालिकेने याची गंभीर दखल घेत अशा भागांत ‘क्लीन अप मार्शल’ची नेमणूक केली. मात्र, पाळीव श्वानांच्या मालकांवर नजर ठेवणाऱ्या पालिकेने रस्त्यावरील भटक्या श्वानांना खाऊ घालणाऱ्यांनाही आवर घालावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

कांदिवली पूर्व येथील ठाकूर गावातील अजित कवळे यांनी आपल्या परिसरातील व्यथा मांडताना सांगितले की, ‘‘प्राण्यांविषयी कणव असणे गैर नाही. आमच्याकडे काही रहिवाशी कुत्र्यांना अन्न देतात. त्यामुळे आमच्या परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कित्येकदा उरलेले अन्न रस्त्यावरच पडून राहते. त्यामुळे परिसर खराब होतो. शिवाय कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागला आहे.’’ या संदर्भात पालिकेकडे तक्रार केली, मात्र तसे करताच परिसरातील प्राणिप्रेमी आमच्याशी भांडायला येतात, असे कवळे म्हणाले. अंधेरी (पूर्व) जेव्हीएलआर भागातही  श्वानविक्रीचा व्यवसाय करणारे काही जण रस्त्यावरच श्वानांना प्रशिक्षण देत असतात.याचा येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी गजानन यशवंत यांनी दिली.

निर्बीजीकरण संथगती

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्याकरिता पालिकेतर्फे निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जाते. पालिकेने २०१४ साली केलेल्या गणनेनुसार मुंबईत शहरात १ लाख १४ हजार कुत्रे आहेत. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कुत्र्यांचे प्राणी जनन नियंत्रण नियमावलीनुसार निर्बीजीकरण करावे लागते. तसेच त्यांना रेबीज लस दिली जाते. मात्र रस्त्यावरील कुत्र्यांना ही लस दिलेली असण्याची शक्यता कमीच. निर्बीजीकरणाची प्रक्रिया फारच संथपणे सुरू आहे. या वर्षी ३६ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे ध्येय आहे.

पालिकेच्या सूचना

* भटक्या कुत्र्यांना एकच ठिकाण ठरवून तिथेच खायला द्यावे.

* कुत्र्यांशी खेळू नये

*  कुत्र्यांची पालिकेच्या केंद्रात वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.

निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांची संख्या (भटके)

* २०१६ – ११,९६७

* २०१७ – २४,२९०

* २०१८ (जुलैपर्यंत) – १३,७१९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 3:24 am

Web Title: new disputes arise due to habit of feeding on the streets
Next Stories
1 २२३ मंडळांना  मंडप परवानगी नाही
2 गोपाळकाल्याच्या निमित्ताने ‘गोकुळ’ फुलवण्याचा निर्धार
3 कचरा वाहून नेण्यासाठी पुन्हा मुदतवाढ
Just Now!
X