उपनगरांच्या वाढत्या विस्तारामुळे पालिका प्रशासनाचा निर्णय
मुंबईचा वाढता विकास, उपनगरांचा होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आदी बाबी विचारात घेऊन मुंबई अग्निशमन दल अधिक बळकट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भविष्यात आणखी २६ अग्निशमन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये विस्तार होऊ लागला आहे. त्याचबरोबर आग लागणे, इमारत कोसळणे, पक्षी अडकणे, रस्त्यावर डिझेल सांडणे, व्यक्ती बुडणे अशा छोटय़ा-मोठय़ा दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईमध्ये अग्निशमन दलाची ३४ अग्निशमन केंद्रे असून आणखी नवी २६ अग्निशमन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

नव्या आराखडय़ात भूखंडांचे आरक्षण
मुंबईच्या २०१४-३४ च्या विकास आराखडय़ामध्ये नव्या अग्निशमन केंद्रांसाठी भूखंड आरक्षित करण्यात येणार आहे. परिसरातील इमारतींची संख्या, लोकसंख्या, परिसराची रचना, आसपास उपलब्ध अग्निशमन केंद्रांचा अंदाज घेऊन नव्या अग्निशमन केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.