पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाच्या सर्व फलाटांना जोडणारा पादचारी पूल शुक्रवारी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या विविध उपनगरी स्थानकांवरील हा १०० वा पादचारी पूल आहे. या पुलाचे काम केवळ रात्रीच्या वेळेत पूर्ण करण्यात आले आहे.सर्वाधिक गर्दी असलेल्या दादर स्थानकावर पादचाऱ्यांसाठी आणखी पूल हवेत, ही मागणी प्रवाशांकडून होत होती. दादर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेस पाचही फलाटांना जोडणाऱ्या या पुलाची रुंदी ६ मीटर आहे. या पुलासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च आला आहे. या पुलाच्या उभारणीसाठी पश्चिम रेल्वेने कोणताही ब्लॉक न घेता केवळ रात्रीच्या वेळी वाहतूक बंद असताना काम केले आहे. दादर, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विरार त्याचप्रमाणे माटुंगा रोड, लोअर परळ आणि महालक्ष्मी येथे आणखी १७ पादचारी पूल उभारण्यात येत असून दादर, अंधेरी आणि बोरिवली येथे १२ सरकते जिने उभारण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.