राजस्थानी व कांग्रा शिल्प बाबत अनेक जणांना माहिती आहे. पण महाराष्ट्राला सुद्धा एक समृद्ध परंपरा आहे किती लोकांना ठाऊक असेल?आजपासून साधारणपणे दहा हजार वर्षांपूर्वी कोकणात दगडांमध्ये कोरलेल्या कातळशिल्पांपासून अजिंठा गुंफामध्ये असलेली भित्ती चित्रं, विदर्भातल्या गोंड राजांच्या काळातली चित्रं, वारली चित्रं सारख्या आदिवासी समाजाने चितारलेली चित्रे, काही भटक्या विमुक्त जमातीच्या मंडळींनी देव्हाऱ्यात रेखाटलेल्या देवांच्या प्रतिमा, तशा अलीकडच्या काळातल्या म्हणजे मराठेशाहीतली भित्ती चित्रं आणि लघुचित्रं यांचा एक समृद्ध इतिहासच आणि परंपरा वाचकांसमोर येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे “महाराष्ट्रीय चित्रशैली” बाबत ग्रंथावर काम सुरू केले आहे. दिलीप बलसेकर, कार्यकारी संपादक आणि सचिव महाराष्ट्र गॅझेटियर विभाग, यांनी असे सांगितले या ग्रंथामध्ये या चित्रशैलीचा इतिहास, त्याची टेक्निक अथवा पद्धती, हि चित्रे किंवा कला यांचा उगम, विकास, टप्पे, आणि ती टिकून राहण्याचे कारण याचा उहापोह करण्यात येईल.

“राजस्थानी कला, कांगरा चित्रशैली, या लोकांना माहित आहेत. पण महाराष्ट्राला सुद्धा स्वतःच्या लघु चित्रांची आणि भित्ती-चित्रांची परंपरा आहे हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. याबाबत उत्कृष्ट काम दिवंगत म.श्री. माटे यांनी केले आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मंदिरांचे एक विशिष्ट असे स्थापत्य अथवा शैली आहे. तसेच त्याच्या चित्रकलेचा सुद्धा वेगळा नमुना आहे. यात लघुचित्रे आणि भित्ती चित्रांचाही समावेश होतो आणि त्याची स्वतःची अशी एक वेगळी रंग शैली आहे,” असे चित्रकार, चित्रशैली इतिहासकार आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ श्रीकांत प्रधान यांनी सांगितले. प्रधान हे या प्रकल्पावर काम करत आहेत.

मराठ्यांची राजवट जशीजशी माळवा, राजस्थान या भागांमध्ये पसरू लागली, त्यावेळेला तिथल्या चित्रकारांचा आणि महाराष्ट्रातल्या चित्रकारांचा संबंध येऊ लागला. महाराष्ट्रातल्या चित्रकारांनी या संकराच्या आधारावर स्वतःची कला आणि शैली निर्माण केली.याची काही वैशिष्ट्ये म्हणजे लाल पार्श्वभूमीवर रेखाटण्यात आलेली रंगीत चित्रे आणि ठळक असा रेषा. याचे नमुने सातारा, पुणे, मेणवली, आणि वाई येथील वाड्यांमध्ये आढळतात.

प्रधान म्हणाले या ग्रंथामध्ये कोकणातल्या कातळशिल्प पासून (यांचे रेखाटन आदिमानवाने साधारणपणे दहा हजार वर्षांपूर्वीपासून ते 2000 वर्षांपूर्वीपर्यंत केले असावे आणि त्यात काही जॉमेट्रिक डिझाईन्स, मानवसदृश आकृत्या, व प्राण्यांच्या चित्रांचा जसे हत्ती, गेंडा वगैरे जे आज त्या भागात सापडत नाहीत ह्यांचा समावेश आहे), अजिंठ्यातील चित्र पैठण चित्र व पिंगुळी चित्र यांच्यासारख्या लोककलेच्या परंपरा, वारली सारख्या आदिवासीं ची चित्र, वाड्या मधली चित्र, लघु चित्र अथवा मिनिएचर पेंटिंग, अशांचा समावेश असेल.

विलक्षण गोष्ट अशी की महाराष्ट्रातील काही भटके विमुक्त समाज उदाहरणार्थ वडार आणि मरीआई वाले यांनी देव्हाऱ्यात रेखाटलेल्या चित्रांचा सुद्धा या पुस्तकात समावेश असेल. याबाबत वडार समाजातल्या देवार्यातील चित्रांबाबत PhD करणारे विक्रम कुलकर्णी हे लेखन करतील. सध्या ते मरीआईवाले समाजाबाबत असाच अभ्यास करत आहेत. “महाराष्ट्राचा अशा चित्रांची परंपरा असल्यामुळे या ग्रंथाचा एकूणच आवाका मोठा असेल,” असे प्रधान यांनी नमूद केले.

बलसेकर म्हणाले की पोथी मधली चित्रं पेशवाईच्या काळातले मुत्सद्दी नाना फडणवीस यांच्या मेणवली  मधल्या वाड्यातली चित्रं आणि चंद्रपूरच्या गोंड राजांच्या काळातील चित्रं यांचा समावेश सुद्धा या गॅझेटमध्ये असेल. ह्या सर्व गोष्टींमुळे हा ग्रंथ कला रसिकांसाठी प्रचंड आकर्षक असेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले.