खगोल विज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा प्रयोग; कृष्णविवरांच्या विलीनीकरणाविषयी नवीमाहिती उपलब्ध, सापेक्षतावादाच्या सिद्धांताला पाठबळ

दोन कृष्णविवरांच्या विलीनीकरणाच्या खगोलीय घटनेत निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींचे निरीक्षण लायगो आणि व्हर्गो या शोधक यंत्रांच्या साहाय्याने करण्यात यश आले आहे. एकूण तीन शोधक यंत्रांनी गुरुत्वीय लहरींचे ध्रुवीकरण मोजणे शक्य झाले, त्यामुळे आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला पाठबळ मिळाले आहे. त्याचबरोबर कृष्णविवराच्या स्थानाची अचूकता टिपणे शक्य झाले आहे. हे ताज्या प्रयोगाचे वैशिष्टय़ आहे.

या संशोधनात जगभरातील वैज्ञानिकांच्या गटात भारतीय वैज्ञानिकांचेही योगदान मोलाचे आहे.  वेगवेगळ्या स्रोतांपासूनच्या गुरुत्वीय लहरी टिपण्याची ही चौथी वेळ आहे. कृष्णविवरांच्या मिलनातील गुरुत्वीय लहरी टिपण्यात यापूर्वी २०१५ मध्ये अमेरिकेतील लायगो उपकरणांच्या मदतीने दोनदा यश आले होते.

आताच्या शोधात सूर्यापेक्षा ३१ व २५ पट वस्तुमानाच्या दोन कृष्णविवरांच्या मिलनाच्या घटनेतून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी टिपण्यात आल्या . कृष्णविवरे एकमेकात विलीन होण्याची ही घटना १.७ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर घडली होती. यातील गुरुत्वीय लहरींची ऊर्जा तीन सूर्याइतकी होती. विश्वात कृष्णविवरे कशा पद्धतीने विखुरलेली आहेत, याचे ज्ञान यातून होणार आहे. पुण्याची आयुका, मुंबईची टाटा मुलभूत विज्ञान संशोधन संस्था यांच्यासह भारतातील अनेक विज्ञान संस्थांचा यात मोलाचा वाटा आहे.

वैशिष्टय़े काय?

अमेरिकेतील लायगो व इटलीतील व्हर्गो या गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रांचा वापर करून १४ ऑगस्ट रोजी द्वैती कृष्णविवर प्रणाली शोधण्यात आली. तीन शोधक यंत्रांचा वापर झाल्यामुळे गुरुत्वीय लहरींचे ध्रुवीकरण मोजणे शक्य झाले यामुळे त्या लहरींचा स्रोत अधिक अचूक पद्धतीने समजू शकला आहे.

नवीन स्रोतापासूनच्या गुरुत्वीय लहरी शोधण्यात आल्याची घटना महत्त्वपूर्ण असून  तीन शोधकांच्या (डिटेक्टर्स) माध्यमातून प्रथमच स्रोत ठरवण्यात आल्याने कृष्णविवराच्या स्थानाची अचूकता ३० वर्ग अंश म्हणजे पूर्वीपेक्षा दहा पटींनी अधिक आहे. भारतात जेव्हा लायगो डिटेक्टर यंत्र सुरू होईल, तेव्हा ही अचूकता आणखी दहा पटींनी वाढणार आहे.  – संजीव धुरंधर, गुरुत्वीय लहरींच्या संशोधनातील ख्यातनाम वैज्ञानिक

शोध का?

माणसाला विश्वाच्या निर्मितीबरोबरच विश्वातील अनेक गोष्टींची उकल अद्याप होऊ शकलेली नाही. यासाठी जगभरात सर्वच विज्ञानशाखांमध्ये विविध प्रयोग सुरू आहेत. याच प्रयोगाचा एक भाग म्हणून गुरुत्वलहरींचा आणि त्याच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे.