आग लागल्याची माहिती देण्यासाठी आपत्कालीन क्रमांक उपलब्ध असला, तरी त्याच जोडीने अग्निप्रतिबंधक उपायांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तसेच अग्निशमन दलाशी सामान्यांना जोडून घेण्यासाठी अग्निशमन दलाकडून आणखी एक मदत क्रमांक जारी करण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यात हा क्रमांक जाहीर केला जाईल. प्रत्येक वास्तू, इमारतीमध्ये अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा बसवणे कायद्यानुसार बंधनकारक असले, तरी अपुऱ्या जागृतीमुळे अनेक रहिवासी संस्थांमध्ये अशी यंत्रणा नसते. काही वेळा यंत्रणा बसवणे गरजेचे वाटत असले तरी त्याविषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे नागरिकांच्या अग्निशमन प्रतिबंधासंबंधीच्या प्रश्नांना तातडीने उत्तर देण्यासाठी, अग्निशमन प्रतिबंध उपायांची माहिती तसेच यंत्रणा बसवण्यास मार्गदर्शन करण्यासाठी अग्निशमन दलाकडून हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. या हेल्पलाइनद्वारे यंत्रणा बसवण्यासाठी अधिकृत परवानाधारक कंपनीची माहिती तसेच अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याबाबत शंकांचे निरसन केले जाईल. या हेल्पलाइनचा क्रमांक पुढील महिन्यात अग्नी सुरक्षा सप्ताहात जाहीर केला जाईल. या हेल्पलाइनवर अग्निशमन दलाचे स्वयंसेवक होण्यासाठीही संपर्क साधता येईल. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत आग विझवण्यासाठी प्राथमिक मदत तसेच आगीत अडकलेल्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम दलाकडून सुरू करण्यात आला आहे. आग लागल्याची माहिती देण्यासाठी अग्निशमन दलाची हेल्पलाइन आहे. शिवाय राष्ट्रीय पातळीवर ११२ ही हेल्पलाइनही सुरू होत आहे. मात्र आपत्कालीन घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक स्तरावर मदतीसाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच हा एक भाग आहे, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.