संदीप आचार्य 
करोनाचे मुंबईतील वाढते रुग्ण लक्षात घेऊन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ( बीकेसी) मध्ये एमएमआरडीएने १००८ खाटांचे रुग्णालय गेल्या आठवड्यात उभारल्यानंतर त्याच्याच शेजारी १२ जूनपर्यंत आणखी ९५० खाटाची व्यवस्था असलेले अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. विशेष म्हणजे येथे अतिदक्षता विभागात १०८ खाटा तर डायलिसीसच्या रुग्णांसाठी २० डायलिसीस मशिन बसविण्यात येणार आहेत. एमएमआरडीएने चीनमधील वुहान येथे जसे वेगाने रुग्णालय उभारले त्याच वेगाने एमएमआरडीचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी अवघ्या १५ दिवसात पहिल्या टप्प्यातील १००८ खाटांचे रुग्णालय उभे केले. याचे कौतुकही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मात्र आता एवढ्या मोठ्या रुग्णालयासाठी पुरेसे डॉक्टर व परिचारिका तसेच अन्य आरोग्य कर्मचारी आणायचे कुठून हा प्रश्न मुंबई महापालिकेपुढे निर्माण झाला आहे.

शंभर खाटांसाठी किमान १२ डॉक्टर, १६ परिचारिका व अन्य कर्मचारी वर्ग लागणार असून किमान या व्यवस्थेसाठी नऊशे ते हजार लोक लागणार असल्याचे पालिकेच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. आजघडीला वैद्यकीय शिक्षण विभागाने अंबेजोगाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पाठवलेले ४७ डॉक्टर येथे पोहोचले असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.  बीकेसीतील या १००८ खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून उद्या फ्युमीगेशननंतर येथे रुग्ण दाखल करण्यास सुरुवात केली जाणार आहे. अवघ्या पंधरा दिवसात जरी हे रुग्णालय उभारण्यात आले असले तरी येथे प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार करण्यात आला आले. महिला व पुरुष डॉक्टरांची राहाण्याची स्वतंत्र व्यवस्था, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची राहाण्याची तसेच स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे, विशेष म्हणजे महापालिका रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या तुलनेत कितीतरी चांगली स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.

रुग्णालयात निम्म्या खाटांच्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था तसेच पुरेशी एक्स- रे मशिन व इसीजीची व्यवस्था आणि स्वतंत्र पॅथॉलॉजी प्रयोगशाळा असल्याने रुग्णांच्या चाचण्याचे अहवाल तात्काळ मिळणार आहेत. याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना विचारले असता ते म्हणाले की, रुग्णालय जरी तात्पुरत्या स्वरुपातील असले तरी दर्जा व डॉक्टर आणि रुग्णांची व्यवस्था उत्तम असेल याची काळजी घेण्यात आली आहे. आगामी ४५ दिवसांसाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच रुग्णांच्या जेवणाची व्यवस्थाही आम्ही केली असून त्यानंतर ही व्यवस्था पालिकेने पाहायची आहे.

या रुग्णालयाशेजारीच आता ९५० खाटांचे आणखी एक रुग्णालय उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. १२ जूनपर्यंत हे काम संपविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. या नव्या रुग्णालयात १०८ खाटा या अतिदक्षता विभागासाठी असतील तर करोना असलेल्या डायलिसीस रुग्णांचा विचार करून आम्ही येथे २० डायलिसीस मशीन बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथेही डॉक्टर- परिचारिका तसेच अन्य आरोग्य सेवकांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. जवळपास सहाशे कामगार दोन पाळ्यांमध्ये हे रुग्णालय उभारण्यासाठी काम करत आहेत.

बीकेसीतील या दोन्ही रुग्णालयात मिळून सुमारे दोन हजार खाटा असणार आहेत तर अतिदक्षता विभागात १०८ खाटांची व्यवस्था राहिल. यासाठी लागणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य आरोग्य सेवक कुठून आणणार हा एक मोठाच प्रश्न पालिका प्रशासनासमोर आहे. दोन हजार खाटांच्या रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवक मिळून सुमारे दोन हजार कर्मचारी लागतील, असे पालिकेच्या काही ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय

मुंबईत अन्यत्र अशाप्रकारे जवळपास जवळपास दहा हजार खाटांची व्यवस्था असलेली तात्पुरती रुग्णालये सुरु करण्यात येत असून त्यांच्यासाठीही मोठ्या प्रमाणात डॉक्टर व परिचारिका लागणार आहेत. या सर्वांना करोना उपचारासाठीचे प्रशिक्षणही द्यावे लागेल, असेही या डॉक्टरांचे म्हणणे आहे. खासगी एमबीबीएस तसेच आयुष डॉक्टरांकडे जरी या व्यवस्थेची जबाबदारी सोपवली तरी गंभीर होणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी विशेषज्ञ डॉक्टरांची गरज लागणार आहे. याचा विचार करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी आता दिवसातून दोन वेळा लोकल ट्रेन चालवली पाहिजे, असे पालिकेच्या एका अधिष्ठात्यांनी सांगितले.

याबाबत अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता ते म्हणाले, “वरळी येथे आम्ही कमीत कमी डॉक्टरांच्या माध्यमातून चांगली सेवा देत आहोत. करोना झालेले व ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांसाठी येथे प्रामुख्याने व्यवस्था करण्यात आलेली आहे. एखादा रुग्ण गंभीर झाल्यास एशियन हार्ट रुग्णालयात तसेच नव्याने तयार होणाऱ्या अतिदक्षता विभागात अशा रुग्णांची काळजी घेतली जाईल. सध्या बीकेसीतील १००८ खाटांसाठी १३५ डॉक्टर व २०० परिचारिकांची व्यवस्था करण्यात आली असून करोनासाठी उभारण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णालयीन व्यवस्थेतील सर्वांनाच आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते”, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले. “अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने लोकल ट्रेन सुरु केल्या तर त्याचा आम्हाला निश्चितच फायदा होईल. मात्र येथील बहुतेक कर्मचाऱ्यांसाठी राहाण्याची तसेच आवश्यकतेनुसार नेण्याआणण्यासाठीची वाहतूक व्यवस्थाही आम्ही केली आहे” असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. तथापि पुरसे डॉक्टर व परिचारिकांच्या उपलब्धतेबाबत पालिकेतील डॉक्टरच साशंकता व्यक्त करत आहेत.