अत्याधुनिक अशा स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली आयएनएस कोची ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते बुधवारी मुंबईतील माझगाव गोदीत या नौकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुंबईत नौदलाच्या माझगाव गोदीत या युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे. आएनएस दिल्ली क्लास नंतर आएनएस कोलकाता क्लास मधील ही दुसरी महत्वाची युद्धनौका आहे. ही युद्धनौका स्टेल्थ प्रकारतील म्हणजे शत्रूच्या रडारवर न दिसणारी आहे. तसेच या युद्धनौकेवर २५० ते ३०० किलोमीटरील लक्ष्याचा अचूक भेद करू शकणारी १६ ब्रम्होस क्षेपणास्त्र तैनात आहेत. अत्याधुनिक संदेश यंत्रणा, मशिनगन आणि इतर सुविधा असल्याने या युद्धनौकेमुळे भारतीय समुद्रकिनार्‍यांची सुरक्षा मजबूत होणार आहे. जगातील मोजक्या युद्धनौकांप्रमाणे जमिनीवरील लांब अंतरावरच्या एखाद्या लक्ष्यावर हवेतून अचूकपणे मारा करण्यासाठी थ्रेट अलर्ट रडार आणि मल्टी-फंक्शन सर्व्हायलन्सची सुविधा आयएनएस कोचीवर उपलब्ध आहे.

आयएनएस कोचीची वैशिष्ट्ये
१६४ मीटर लांबी, १७ मीटर रुंद
७५०० टन वजन, ३० सागरी मैल
पूर्णपणे स्वदेशी बनावट
शत्रूंच्या रडारला चुकवण्याची क्षमता असलेले स्टेल्थ तंत्रज्ञान
३० अधिकार्‍यांसह ३५० जवान तैनात करण्याची क्षमता
नौकेवर ब्राम्होस क्रूझ क्षेपणास्त्र, लांब पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र, टॉर्पेडो, रॉकेट, ७६ मि.मी. गन आणि ३० मि.मी.गन
युद्धनौकेत सिकिंग आणि चेतकसारखे हेलिकॉप्टर्स तैनात