दिवाळीच्या खरेदीतील पहिला मान हा खरेतर दिव्यांचा म्हणजे रंगीबेरंगी पणत्या आणि घरासमोरचा परिसर उजळून टाकणाऱ्या आकाशकंदिलांचा आहे. घरोघरी फराळाचा घमघमाट असला तरी दारात आकाशकंदील लावल्याशिवाय दिवाळीच्या स्वागताची तयारी अपूर्ण असते. त्यामुळे ठिकठिकाणी रांगेत असलेल्या छोटय़ा छोटय़ा दुकानांवरून नजर फिरवताना आपले लक्ष वेधून घेतात ती काठय़ांच्या रांगेत लावलेली विविध आकारांची, रंगांची, दिव्यांनी झगमगणारी आकाशकंदिलांची दुकाने. आकाशकंदिलांच्या दुनियेत चिनी आकाशकंदिलांनी त्यांच्या टिकाऊपणामुळे आपले स्थान कायम केले आहे. मात्र, काडय़ा काडय़ा जोडून त्यावर पतंगाच्या कागदाने तयार केलेले पारंपरिक आकाशकंदील हीच कित्येकांची आवड असते. या वर्षी कागदी कंदिलांना कमी मागणी असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
आकाशकंदील घेताना खरेतर त्यांचा आकार, त्यांच्यावरचे नक्षीकाम आणि त्यात बल्ब लावल्यानंतर पडणारी प्रकाशाची रांगोळी किती सुंदर दिसते, या सगळ्याचा विचार करून खरेदी केली जाते. त्यामुळे कागदी आकाशकंदिलांपाठोपाठ चांदणी आकारांच्या आकाशकंदिलांना जास्त मागणी असते. या चांदण्या हव्यातितक्या मोठय़ा आकाराच्या घेता येतात. त्यावरचे नक्षीकाम सुरेख असेल तर या चांदण्यांतून रंगणारा प्रकाशाचा खेळही तितकाच मोहक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत कागदी आकाशकंदिलांप्रमाणेच चांदणी आकाशकंदिलांची मागणी कमी झाली असल्याचे विक्रेते सांगतात. कागदांचे भाव वाढल्याने कागदी कंदिलांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे साहजिकच या आकाशकंदिलांची मागणी घटली असल्याचे दादर येथील गणेश कांबळे या कंदील विक्रेत्याने सांगितले. सध्या बाजारात विविध आकारांचे, रंगांचे कंदील अगदी शंभर रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत.
पारंपरिक आकाशकंदिलांना फाटा देत नवीन रचना आणि कच्चा माल वापरून काही नव्या प्रकारचे कंदिल बाजारात आणण्यात आले आहेत. यात ‘केरला चांदणी’ हा रेडियमचा वापर असलेला नवीन प्रकार पाहायला मिळतो. तर काही दुकानांमध्ये पिंजरा, फळ-फुलांचे आकार, तोरणांचे कंदील अशा विविध प्रकारांतील आकाशकंदील पाहायला मिळतात. वारली चित्रे असणारे कंदीलही आकर्षक आहेत. छोटा भीम, डोरेमॉन इत्यादी कार्टून्सचे चित्र असणारे थर्माकॉलपासून बनविलेले कंदीलही बाजारात आहेत. नाइट लॅम्पप्रमाणे दिसणारे छोटय़ा-मोठय़ा गोल आकाराचे विविध रंगांतील आकाशकंदील, कमळाच्या आकारातील प्लॅस्टिकचे कंदील याचबरोबर इकोफ्रेंडली कागदी कंदीलही कु ठे कुठे पाहायला मिळतात. दरवर्षी दिवाळीच्या दोन आठवडे आधीपासूनच लोकांची खरेदीसाठी गर्दी होते. अगदी दिवाळीच्या आधीच्या आठवडय़ातच इमारतीच्या प्रत्येक खिडकीतून लटकणारे आकाशकंदील दिवाळीच्या आगमनाची जाणीव करून देत असतात. मात्र, या वर्षी महागाईमुळे दिवाळी खरेदीसाठी लोकांचा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद आहे, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. खरेदीसाठी हा शेवटचा शनिवार-रविवार असल्याने या दोन दिवसांत प्रचंड गर्दी होईल, अशी अपेक्षा दुकानदारांनी व्यक्त केली.