हार्बर मार्गावरून मुख्य मार्गावर येणाऱ्या गर्दीला सामावण्यासाठी आणि दादर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला ते कल्याण यांदरम्यान ११ नव्या सेवा सुरू करण्याचा विचार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सेवा जानेवारी महिन्यापासून लागू होणाऱ्या नव्या वेळापत्रकात समाविष्ट असल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत मध्य रेल्वे प्रशासनातर्फे अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या सेवांबरोबरच ट्रान्स हार्बर मार्गावर २२ सेवा आणि हार्बर मार्गावर सात अतिरिक्त सेवा चालवण्यात येतील.

मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक २६ जानेवारीपासून अमलात येण्याची शक्यता आहे. सध्या नियोजनावस्थेत असलेल्या या वेळापत्रकात हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा वाढतील, असा अंदाज याआधीच वर्तवण्यात आला आहे. मात्र गाडय़ांच्या कमतरतेमुळे मुख्य मार्गावरील सेवांमध्ये वाढ करण्याबाबत प्रश्नचिन्ह होते. पण मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील प्रवाशांना दिलासा देत या मार्गावर ११ नव्या सेवा सुरू करण्याचा विचार केला आहे.
या सेवा कुर्ला ते कल्याण या दरम्यान धावतील. कुल्र्याच्या पुढे किंवा कुल्र्यापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना अनेक पर्याय आहेत. मात्र कल्याण ते कुर्ला या दरम्यानच्या मोठय़ा प्रवासी संख्येला दिलासा देण्यासाठी या सेवा चालवण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या सेवा कोणत्या वेळेत चालवण्यात येतील, याबाबत दोन ते तीन दिवसांत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला विचारले असता मुख्य मार्गावरील प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल, एवढेच अधिकृतरित्या सांगण्यात आले.