मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि धानुका समितीच्या शिफारशींनुसार मोडकळीस आलेल्या ९४ पालिका शाळांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून या कात टाकलेल्या पालिका शाळांना नवा चेहरा मिळाला आहे. दर्शनी भागावरील आकर्षक रंगसंगतीमुळे एखाद्या आंतरराष्ट्रीय शाळेचे रूप मुलुंडमधील गव्हाणपाडा मनपा शाळेला मिळाले आहे. मात्र या शाळांच्या शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
पालिका शाळांतील निकृष्ट सोयीसुविधांबाबत वाय. आर. मिस्त्री यांनी २००१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने पालिका शाळांच्या पाहणीसाठी डी. आर. धानुका यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने १७९ शाळांची दुरुस्ती आणि दजरेन्नती करण्याची शिफारस केली होती.
पालिका शाळांची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच मुलांना शाळेचे आकर्षण वाटावे म्हणून इमारतीची नवी रचना करण्यात आली आहे. मुलुंड, गव्हाणपाडा मनपा शाळा त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
या शाळेच्या दर्शनी भागावर दोन मजल्यापर्यंत उंच बालभारतीचे चित्र असलेले वहीचे पान, तसेच तीन मजल्यापर्यंत पेन्सिलचा आकार देण्यात आला आहे. शाळेत प्रवेश केल्यानंतर समोर दिसते ती भव्य आर्ट गॅलरी. महापुरुष, तसेच शास्त्रज्ञांची चित्रे, छतावर रेखाटलेले सूर्यमंडळ आदींमुळे ही आर्ट गॅलरी नजरेत भरते. शाळेची संरक्षक भिंत निरनिराळ्या चित्रांनी सजविण्यात आली असून त्यातून शिक्षणविषयक संदेश देण्यात आला आहे.

पालिकेचा नवा घाट
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊन पालिकेच्या शाळा एकामागून एक बंद पडत असताना प्रशासनाने मात्र सात नव्या शाळा सुरू करण्याचा घाट घातला आहे. पालिका कुरार गाव, इराणी वाडी, अजिज बाग,गोवंडी, शताब्दी रुग्णालयाजवळ,विलेपार्ले (पूर्व), माटुंगा आणि प्रतीक्षा नगर या सात ठिकाणी शाळा सुरू करणार आहे.