सीएसएमटी ते पनवेल या हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर मोठय़ा प्रमाणात असलेल्या वळणांमुळे (वक्र) चाकांचे घर्षण झाल्याने होणाऱ्या बिघाडांचा सामना करण्यासाठी नवीन ‘चाक वंगण यंत्रणा’ मध्य रेल्वेने आणली आहे.

सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर मोठय़ा प्रमाणात वळणे आहेत. वळणांमुळे लोकलचे रुळांवर सातत्याने घर्षण होते. अशा ठिकाणी वेगमर्यादाही निश्चित केल्या आहेत. तरीही चाकांचे घर्षण होऊन त्यांची झीज होते व लोकल जागीच थांबणे, रुळांवरून घसरणे इत्यादी प्रकार घडतात. आठवडय़ातून सरासरी दोन लोकल गाडय़ांमध्ये असे प्रकार होतात. त्यामुळे लोकल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये नेण्याशिवाय पर्याय नसतो. दुरुस्तीसाठी एक ते दोन दिवस लागत असल्याने त्याचा वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन हार्बरवासीयांचे हाल होतात. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

चाक वंगण यंत्रणेत चाकांना विशिष्ट प्रकारचे वंगण लावून त्यांची रुळांवरून धावताना घर्षण होणार नाही वा त्यांची झीज होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. लोकल गाडय़ांच्या खालच्या भागांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येत आहे. लोकल सुरू होताच चाकांमधून वंगण निघेल व आपोआप ते अन्य चाकांनाही मिळेल. त्यामुळे चाकांचे आयुर्मानही वाढणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक एस. जैन यांनी दिली.