नवनिर्वाचित आमदारांना विधिमंडळाच्या कामकाजाची आणि त्यासाठी वापराव्या लागणाऱ्या संसदीय आयुधांबाबत विधानमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गाला पहिल्यांदाच निवडणूक आलेलया १३० पैकी केवळ ७० आमदारच उपस्थित होते. त्यामुळे विधानमंडळाचे कामकाज जाणून घेण्याबद्दलची लोकप्रतिनिधींची आनास्था पुन्हा समोर आली आहे.

विधानसमंडळ सचिवालयाच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय संसदीय अभ्यास वर्गाला आज पहिल्या दिवशी बेताचीच उपस्थिती होती. पहिल्यांदाच निवडूण आलेलया १३० सदस्यांपैकी केवळ ७० सदस्य उपस्थित होते. तर जुन्या सदस्यांची उपस्थितीही कमीच होती. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे संसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता आदी उपस्थित होते. सदस्यांनी अभ्यासपूर्वक आणि लोकहिताचे प्रश्न विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडून जनतेला न्याय मिळवून द्यावा आणि विधिमंडळाची गौरवशाली परंपरा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले. सदस्यांनी जास्तीत जास्त वेळ सभागृहात उपस्थित राहून कामकाज समजावून घेतले पाहिजे आणि त्यानुसार जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजेत. प्रत्येक प्रशिक्षण काही तरी नवीन शिकवीत असते. त्यामुळे सदस्यांनी प्रशिक्षणात सहभाही होणे गरजेचे असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी मारला. या अभ्यास वर्गात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी संसदीय लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्षाची भूमिका आणि मंत्र्यांचे दायित्व, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय प्रक्रिया, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संसदीय कामकाज प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले.