‘जंगजौहर’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाची घोषणा

‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पानिपत द ग्रेट ब्रिटेयल’ या हिंदी-मराठी ऐतिहासिक चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहता निर्मात्यांना ऐतिहासिक चित्रपट करण्याचा मोह आवरत नाही आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांचा हा सिलसिला पुढच्या वर्षीही सुरू राहणार असून आपल्या पराक्रमाने पावनखिंड अमर करणाऱ्या बाजीप्रभू देशपांडेंची शौर्यगाथा दोन मराठी चित्रपटांमधून जिवंत होणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘जंगजौहर’, तर दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटाची घोषणा केली आहे.

सध्या ऐतिहासिक विषयांवरील मालिका-चित्रपट यांना हिंदी आणि मराठीत दोन्हीकडे यश मिळते आहे. हिंदीत याआधी ‘जोधा अकबर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि आता ‘पानिपत’ असे ऐतिहासिक चित्रपट यशस्वी झाले आहेत, तर मराठीत ‘र्फजद’, ‘हिरकणी’ तसेच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली. हीच बाब लक्षात घेऊन मराठीतही पुढच्या वर्षी ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

योगायोगाची गोष्ट म्हणजे मराठीत ऐतिहासिक चित्रत्रयीची घोषणा केलेल्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटानंतर पावनखिंडीत शूरपणाने लढलेल्या बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांच्यावरील ‘जंगजौहर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे, तर ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटानंतर आपण ‘पावनखिंड’ हा चित्रपट करणार असल्याची घोषणा दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी केली आहे.

ऐतिहासिक ग्रंथ, तसेच मूळ कागदपत्रे यांच्या अभ्यासावर आधारित ‘जंगजौहर’ हा चित्रपट पुढील वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.  शिवाजी महाराजांच्या कथामालिकेतील चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. यात महाराजांच्या वेगळ्या पैलूवर नजर टाकण्यात येणार आहे. चित्रपटात महाराष्ट्राची भौगोलिक माहिती, शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते, तसेच सरदारांना येत असणारी धनुर्विद्या आणि साहसी खेळ यावर जास्त भर देण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.

अभिजीत देशपांडे यांच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारीत सुरू होणार असून दिवाळीच्या आसपास तो प्रदर्शित होणार आहे. ‘‘आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तके आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटात आपल्या पराक्रमाने पावनखिंड अमर करणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांची कथा मांडण्यात येणार आहे. याद्वारे बाजीप्रभूंची कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला हेतू असल्याचे अभिजीत देशपांडे यांनी स्पष्ट केले.

बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरचे नाटकही रंगभूमीवर?

‘पावनखिंड’ या नावाने नाटकही रंगभूमीवर येणार असल्याची चर्चा नाटय़वर्तुळात सुरू असून यासाठी कलाकारांचा शोध सुरू आहे. हे नाटक कधी रंगभूमीवर येणार, यातील कलाकार आणि नाटकाचा विषय हे अजूनही गुलदस्त्यात आहे.