समाजातील अन्याय आणि अत्याचारांचा मुकाबला करणाऱ्या, नवनवी आव्हाने पेलणाऱ्या ‘नवदुर्गा’चा सन्मान शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ‘लोकसत्ता’ आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत समाजासाठी आदर्श ठरलेल्या  नवदुर्गाचा सन्मान होणार असून या वेळी नृत्य-सुरांचा आनंद देणारा कार्यक्रमही होणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे हा कार्यक्रम होईल.
तुमच्या-आमच्यातील दुर्गाच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी, यासाठी यंदा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘शोध नवदुर्गाचा’ हा उपक्रम ‘लोकसत्ता’ने राबवला होता. त्यात अशा नऊ महिलांच्या कार्याची ओळख लेखांच्या स्वरूपात करून देण्यात आली होती. यापैकी कुणी स्वत:वरील किंवा इतरांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. कोणी स्वाभिमानी बाण्याने सामाजिक अत्याचारांविरोधात लढत आहे. अबलांना सबला बनवत आहे. तर कुणी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत उच्चपद मिळविले आहे. स्त्रीच्या अशा स्वाभिमानी, कर्तृत्ववान, धीरोदात्त, लढवय्या रूपाची ओळख या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. आता या नवदुर्गाचा सन्मान शुक्रवारी होणार आहे.
या समारंभात ‘निर्मिती-मिती क्रिएशन्स’तर्फे ‘संगीतमय सन्मान सोहळा नवदुर्गाचा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सोनिया परचुरे, माधुरी करमरकर, तनुजा जोग, अद्वैता लोणकर आणि इतर सहकारी कलाकार यात सहभागी होतील. हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका रवींद्र नाटय़मंदिर येथे उपलब्ध असतील. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी प्रथम येणाऱ्यास प्रवेशाकरिता प्रथम प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क- ६७४४०३४७/३६९.