News Flash

मुंबई सुरक्षितच राहणार

नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा विश्वास

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे

नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा विश्वास

मुंबई : मुंबई सुरक्षित होती, सुरक्षितच राहणार, असा विश्वास मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ल्यानंतर अंतर्गत सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, असे बर्वे यांनी स्पष्ट केले.

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर गुरुवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. तर मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांच्यावर सोपवण्यात आली. या दोन्ही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला.

सद्यस्थितीत (सीमेवरील घडामोडी) सतर्क राहणे, काही संशयास्पद किंवा अयोग्य आढळल्यास पोलिसांना माहिती देणे इतकीच सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी आहे. उर्वरित जबाबदारी पोलीस, लष्कराची आहे. सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. शहर, राज्य आणि देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलीस यंत्रणांची आहे. मुंबईचा विचार करता सीमेवरील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवणे आवश्यक आहे, ती वाढवली जाईल. गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवले जाईल. याशिवाय सायबर आणि आर्थिक गुन्हे रोखणे, शहरवासीयांना सुरक्षिततेची जाणीव करून देणे हे उद्दिष्ट असल्याचे बर्वे यांनी स्पष्ट केले.

कर्तव्यकठोर अधिकारी

उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामुग्रीच्या जोरावर अचूक कामगिरी करवून घेण्यात बर्वे यांचा हातखंडा मानला जातो. पोलीस दलात कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ३२ वर्षांच्या कारकिर्दीत जगभरातील पोलीस दलांच्या कार्यपद्धतीचा बर्वे यांचा उत्तम अभ्यास आहे.

१९८७ तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले बर्वे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. तत्पूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावले, अतिरिक्त महासंचालक(प्रशासन) या पदावर कार्यरत असताना त्यांनी राज्य पोलीस दलाचा प्रशासकीय कारभार हाकला. सुमारे तीन वष्रे त्यांनी नाशिक येथील राज्य पोलीस अकादमीचे संचालकपद भूषवले. दोन वष्रे ते मुंबईच्या वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त होते. राज्य राखीव पोलीस बलाचे उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी काही काळ कर्तव्य बजावले. त्याआधी ते मुंबई पोलीस मुख्यालय, परिमंडळ आठ आणि सहाचे उपायुक्त होते. वर्धा आणि गडचिरोली जिल्हयांमध्ये त्यांनी अधिक्षक म्हणून काम केले. नाशिक ग्रामीण येथे अतिरिक्त अधिक्षक ही त्यांची पहिली नेमणूक होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 3:58 am

Web Title: new police commissioner sanjay barve talk about mumbai security
Next Stories
1 भ्रष्टाचाराला थारा देऊ नका!
2 मेट्रो प्रकल्पांवर भर
3 कमला मिल आगीप्रकरणी आणखी तिघे दोषी
Just Now!
X