दत्तक तत्त्वावर दिलेले मोकळे भूखंड अद्याप मुंबई महापालिकेच्या ताब्यात आलेले नसतानाच पालिकेने या भुखंडांच्या देखभालीसाठी आणखी एक धोरण आणण्याची तयारी सुरु केली आहे.   हे भुखंड देखभालीसाठी काही संस्थांना ११ महिन्यांकरीता देण्याचा निर्णय प्रशासनाने २०१७ मध्ये घेतला होता. मात्र त्याला प्रचंड विरोध झाल्यानंतर हे धोरण मागे घेण्यात आले. आता पालिका प्रशासनाने या भूखंडांच्या देखभालीसाठी पुन्हा नव्याने धोरण आणण्याचे ठरवले असून त्याकरीता नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागवले आहेत.

मनोरंजन मदाने आणि खेळाची मदाने यासाठी आरक्षित असलेले सुमारे २३५ भूखंड देखभालीसाठी देण्यावरून गेल्या काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. ही मदाने काळजीवाहू तत्त्वावर काही संस्थांना देखभालीसाठी देण्यात आली होती. शिवसेना व भाजपच्या काही नेत्यांकडे हे भूखंड असल्यामुळे त्याला राजकीय रंग प्राप्त झाला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे भूखंड परत घेण्यात आले होते. अद्याप काही संस्थांनी, राजकारण्यांनी हे भूखंड पालिकेला परत दिलेले नाहीत. त्यातच पालिकेने हे भूखंड पुन्हा संस्थांना एक धोरण आणले होते. सभागृहाने त्या धोरणाला मंजूरी दिल्यानंतर त्याला मोठय़ा प्रमाणावर विरोध झाला. त्यानंतर पालिकेने धोरण मागे घेतले. आता पुन्हा नव्याने धोरण येणार असल्यामुळे त्यात नक्की काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई उपनगर व शहर भागात  सुमारे १ हजार ६८ भुखंडांवर महापालिकेची उद्य्ने, मैदाने व मनोरंजन मैदाने आहेत. या सुविधांचा वापर नागरिकांद्वारे मोठय़ा प्रमाणात नियमितपणे केला जात असतो. या उद्यानांची व मैदानांची देखभाल  ही स्वयंसेवी संस्था, सोसायटी, व्यक्ती यांच्या सहकार्यासह अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यादृष्टीने नवीन धोरण आणण्याचे पालिकेने ठरवले आहे. या नव्या धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने नागरिकांकडून सूचना, अभिप्राय व सल्ले आमंत्रित केले आहेत.

सूचना-अभिप्रायासाठी १५ दिवस

उद्याने व मैदाने देखभालीसाठी महापालिकेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या धोरणाच्या प्राथमिक मसुद्याबाबत नागरिकांद्वारे पाठविण्यात येणाऱ्या सूचना या महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जाणार असून, त्या विषयीची माहिती वृत्तपत्रातून प्रकाशित केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या सूचना, अभिप्राय, सल्ले इत्यादी पुढील १५ दिवसात ‘इ-मेल‘ द्वारे किंवा टपालाद्वारे पाठवावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी आपल्या सूचना उद्यन अधिक्षक व वृक्ष अधिकारी,वीरमाता जिजाबाई भोसले उद्यन, हॅम्बोल्ट पेंग्विन कक्ष, दुसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा (पूर्व),मुंबई – ४०० ०२७. या पत्त्यावर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.  ईमेल पत्ता: jtmc.vig@mcgm.gov.in व sg.gardens@mcgm.gov.in