‘विशाल युती’मध्ये सामील होण्यास ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतरही, ‘खिडकीतून डोळे मारणे’ सुरूच असून, ‘टाळी’साठी पुढे केलेला हात शिवसेनेने अजूनही मागे घेतलेला नसल्याचे व सेना-भाजप-रिपाईं महायुतीचे दरवाजे मनसेसाठी अजूनही उघडे असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महायुतीमध्ये मनसेला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे ‘अंधूक’ संकेत महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लगेचच शिवसेनेच्या मुखपत्रातून फडणवीस यांना फटकारले गेले, आणि फडणवीस यांनीदेखील मनसेसोबतच्या विशाल युतीचा विषय झटकून टाकला. राज्यातील भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी ‘मनसे’सह सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करण्याचा फडणवीस यांचा मनोदय शिवसेनेला पसंत नसल्याचे याच मुखपत्रातून स्पष्ट करण्यात आले होते. आता मात्र, ‘सोबत येतील त्या सर्वाना’ बरोबर घेऊन सत्ता काबीज करण्याचे शिंग शिवसेनेने फुंकले आहे. राज्यात सत्ता आणण्यासाठी जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ, पण जे येणार नाहीत त्यांना गाडून पुढे जाऊ, अशी घोषणा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्यामुळे, अजूनही मनसेने ‘दिली तर टाळी, नाही तर अळीमिळी’ असे शिवसेनेचे धोरण राहील, असे दिसत आहे. शिवसेनेच्या याच धोरणावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली होती, व ‘खिडकीतून डोळे कसले मारता’, अशा शब्दांत खिल्लीही उडविली होती.
राज्यात सत्तापालट घडविण्यासाठी व काँग्रेस आघाडीच्या विरोधातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे धोरणच शिवसेनेनेही अखेर स्वीकारल्याचे या नव्या घोषणेतून स्पष्ट झाले आहे. ‘याल तर तुमच्यासोबत’ या घोषणेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याकरिता शिवसेना प्रयत्नशील असल्याचेही दिसू लागले आहे. त्यातूनच, ‘मनसे’ने न मागताही नाशिकमध्ये स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेच्या रमेश धोंगडे यांना पाठिंबा देऊन सेनेने टाळीसाठी पुन्हा एकदा हात पुढे केल्याचे बोलले जाते. नाशिकमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपने मनसेला सहकार्य केले होते, तर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली होती. मात्र, प्रभाग समित्यांच्या निवडणुकीपाठोपाठ स्थायी समितीसाठीही शिवसेनेने काँग्रेस आघाडीशी फारकत घेऊन ‘मनसे’ला मदत केली, व टाळीसाठी पुढे केलेला हात अजूनही मागे घेतलेला नाही, असे संकेतही दिले. शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या जाहिरातीतही, ‘टाळी’ देण्याची तयारीच व्यक्त होत असल्याचे दिसते. विशालयुतीत आलात, तर आम्ही तयार आहोत, पण आला नाहीत तर मात्र गाडून पुढे जाऊ या असे बजावत, निर्णयाचा अंतिम इशाराच मनसेला देण्यात आल्याचे मत व्यक्त होत आहे.