पालिकेच्या ‘खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा’ या योजनेचा कालावधी संपलेला असला तरी या सात दिवसाच्या कालावधीत खड्डय़ांच्या तक्रारींनी नवा विक्रम रचला आहे. खड्डय़ांच्या तक्रारींसाठी पालिकेने सुरू केलेल्या अ‍ॅपवर गेल्या दीड महिन्यात जेवढय़ा तक्रारी आल्या होत्या त्यापेक्षा जास्त तक्रारी गेल्या सात दिवसांत आल्या आहेत.

पालिकेने खड्डय़ांच्या तक्रारी  नोंदवण्यासाठी १९ सप्टेंबरला ‘माय बीएमसीपॉटहोल फिक्सइट’हे मोबाइल अ‍ॅप सुरू केले. या अ‍ॅपवर गेल्या दीड महिन्यात १०७० तक्रारी आल्या होत्या. त्यातच पालिकेने मुंबईत १ नोव्हेंबरपासून ‘खड्डे दाखवा आणि ५०० रुपयांचे बक्षीस मिळवा’ अशी योजना आणली. या योजनेअंतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत  एकूण १६७० तक्रारी आल्या. त्यापैकी ११५५ ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तक्रारींपैकी ११४८ खड्डे बुजवले असल्याचे आकडय़ांवरून पुढे आले आहे. त्यामुळे आतापर्यंत या अ‍ॅपवर एकूण सुमारे साडेतीन हजार तक्रारी आल्या आहेत.

यापैकी ७६२ तक्रारी या अन्य प्राधिकरणांच्या रस्त्यांवर होत्या. त्यामुळे एकूण २७०० पेक्षा अधिक तक्रारी या अ‍ॅपच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या. तर सुमारे अडीच हजार खड्डे बुजवण्यात आले.

दरम्यान, पाचशे रुपये बक्षीसाची घोषणा प्रशासनाने के ल्यामुळे या योजनेची खूप चर्चा झाली व तक्रारदारांनी मोठय़ा संख्येने तक्रारी केल्या. मात्र मोहीम संपून एक दिवस उलटला तरी पात्र तक्रारदारांना बक्षीस देण्याबाबत प्रशासनाने अद्याप काहीही घोषणा केलेली नाही. २४ तासांत खड्डा बुजवला नाही तर अधिकाऱ्यांच्या किंवा कंत्राटदाराच्या खिशातून पैसे दिले जातील, अशी घोषणा केली होती. ज्यांच्या तक्रारी २४ तासांनंतर बुजवल्या गेल्या त्यांना हे बक्षीस प्रशासनाला द्यावे लागणार आहे. मात्र हे बक्षीस कधी, कुठे, कसे देणार याबाबत काहीच माहिती प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.