News Flash

गृहविलगीकरणासाठी नवी नियमावली

मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुभा देण्यापूर्वी रुग्णाच्या घराची पडताळणी; दररोज घरी जाऊन विचारपूस करण्याचे निर्देश

मुंबई : अटीसापेक्ष रुग्णांना मोठ्या संख्येने गृहविलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र या रुग्णांमुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याचे प्रकार वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता गृहविलगीकरणात राहू इच्छिणाऱ्या रुग्णाच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था आहे की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दर दिवशी गृहविलगीकरणातील किमान १० टक्के रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करण्याचे निर्देश वैद्यकीय पथकांना देण्यात आले आहेत.

त्रुटी दूर करण्यासाठी गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी नव्या सूचनांचा समावेश असलेली सुधारित नियमावली प्रशासनाने गुरुवारी जाहीर केली. तसेच प्रसूतिकाळ दोन आठवड्यांवर आलेल्या गर्भवती महिलांना गृहविलगीकरणाची मुभा देऊ नये, असेही या नियमावरील स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांना बहुतांशी घरी विलगीकरण करून औषधोपचार दिले जातात. गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्या मोठी असल्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांसह वैद्यकीय मंडळी आणि रुग्णशय्यांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नियंत्रण कक्ष यांच्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने के लेल्या विविध सूचना समाविष्ट असलेले सुधारित परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित केले आहे.

गृहविलगीकरण कोणाला?

’ जे रुग्ण करोना चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांना घरी विलगीकरण करता येऊ शकते.

’ लक्षणे नसलेले बाधित

’ सौम्य लक्षणे असलेले (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप १०० फॅरनहाईटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा अधिक)

’ प्रौढ व सहव्याधी असलेले रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक) किंवा सौम्य लक्षणे असलेले बाधित म्हणून निर्देशित करणे आवश्यक असेल.

’ प्रसूतिकाळ दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना घरी विलगीकरण लागू नसेल. तर स्तनदा मातांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या विचारविनिमयानुसार योग्य निर्णय घेतला जाणार.

रुग्णाने घ्यावयाची काळजी

’ संबंधित रुग्णाने पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मोमीटर, फेस मास्क, हातमोजे, निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) इत्यादी साधने बाळगून त्यांचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे.

’ विभाग कार्यालय, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रकृतीबाबत विचारणा करण्यासाठी येणारे दूरध्वनी स्वीकारून अद्ययावत माहिती त्यांना कळवावी. महत्त्वाच्या आरोग्य निकषांच्या नोंदी ठेवाव्यात.

’ रुग्ण बरे झाल्यास त्यांचे विलगीकरण पूर्ण झाल्याबाबत प्रचलित वैद्यकीय उपचार पद्धतीनुसार वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक संमतीने निर्णय घेतील.

…तरच गृहविलगीकरण

’ रुग्णांच्या घरी स्वत:ला वेगळे करून घेण्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही विलगीकरणाच्या पुरेशा सुविधा असाव्यात.

’ रुग्णासाठी खेळती हवा असलेली खोली व स्वतंत्र प्रसाधनगृह असावे.

’ रुग्णाने कुटुंबातील इतर सदस्यांपासून विशेषत: सहव्याधी असलेली ज्येष्ठ मंडळी यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवावे.

’ घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णाबाबत नातेवाईक, शेजारी,

गृहनिर्माण पदाधिकारी, नियमित कौटुंबिक चिकित्सक  यांना माहिती असणे आवश्यक .

नियंत्रण कक्षासाठी सूचना

रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी  २४ विभाग कार्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांनाही सूचना केल्या आहेत. दररोज बाधितांची यादी प्राप्त झाल्यानंतर गरजू रुग्णांना रुग्णवाहिकांच्या साहाय्याने रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी व निर्धारित निकषांनुसार पात्र रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवावे. ही कार्यवाही त्याच दिवशी पूर्ण करावी. गृहविलगीकरणातील रुग्णांची यादी आरोग्य केंद्राला पाठवून त्याची पडताळणी करावी.  गृहविलगीकरणात राहून केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन केले जाईल, याबाबत रुग्णाकडून लेखी घ्यावे.

…तर पोलिसात तक्रार

गृहविलगीकरणातील रुग्ण स्वत:च्या प्रकृतीचे योग्यरीत्या निरीक्षण करून नोंदी ठेवत आहे, औषधोपचार नियमितपणे घेत आहे, घराबाहेर पडत नाही, करोना प्रतिबंध सुसंगत वर्तणूक आहे, दूरध्वनी संपर्कावरून योग्यरीत्या माहिती देतो, या सर्व बाबींची खातरजमा वॉर्ड वॉर रूमने नियमितपणे करावयाची आहे. गृहविलगीकरणातील एकूण रुग्णांपैकी किमान १० टक्के रुग्णांच्या घरी समर्पित वैद्यकीय पथकाने दररोज आळीपाळीने भेटी देऊन सर्व बाबींची पडताळणी करावी. रुग्ण किंवा संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. कार्यवाहीला सहकार्य न केल्यास रुग्णाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:02 am

Web Title: new regulations for home separation akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उपाहारगृह व्यावसायिकांचा निर्बंधांना विरोध
2 ‘म्हाडा’च्या अभय योजनेत सेवा शुल्कावरील व्याज माफ
3 निर्बंधांचा बोट पर्यटनाला फटका
Just Now!
X