उपकरणासह अ‍ॅपही विकसित; राज्य सरकारचे मात्र दुर्लक्ष

ग्रामीण पाश्र्वभूमी असलेले आयआयटीच्या तरुण उद्योजक-संशोधकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या चाचण्या सोप्या पद्धतीने करण्याची संकल्पना विकसित केली आहे. तसेच त्याचा डाटाबेस थेट डॉक्टर व रुग्णालयात उपलब्ध राहावा यासाठी ‘अ‍ॅप’ही तयार करण्यात आले आहे. या तरुण उद्योजकांच्या कल्पकतेला शासनाच्या ‘स्टार्ट अप’ घोषणेची साथ हवी आहे.परंतु, गर्भवती महिलांच्या चाचण्यांसाठीचे संशोधन ‘सिद्ध’ होऊनही राज्य शासनाला ‘मेड इन इंडिया’ला साथ देण्यासाठी वेळ मिळालेला नाही.

आयआयटी, मुंबईमधील ‘साईन’(सेंटर फॉर इनोव्हेशन अँण्ड आंत्रप्रिनरशीप)ची २००४ मध्ये स्थापना झाल्यानंतर आयआयटीतील अनेक तरुणांनी परदेशात जाऊन नोकरी करण्याऐवजी भारतात उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. ‘साईन’च्या या बिझनेस इन्युबेटर सेंटरमधून अनेक तरुण उद्योजक तयार झाले आहेत. शंतनू पाठक आणि आदित्य कुलकर्णी या तरुणांना याच ‘साईन’ने घडविले. शंतनू पाठक याने बायोमेडिकलमध्ये पीएचडी केली. ‘केअर एनएक्स’ ही आरोग्याच्या समस्यांना वहिलेल्या कंपनीची त्यांनी स्थापना केली. या तरुणांनी गर्भवती महिलांच्या हिमोग्लोबीन, युरिन प्रोटिन, ब्लड शुगर, फेटल हार्ट रेट आणि रक्तदाब मोजण्यासाठी ‘सौर उर्जेच्या वापरावर चलणारा सुटसुटीत पोर्टेबल निदान किट’ तयार केला. या किटद्वारे केल्या जाणाऱ्या चाचण्यांची माहिती मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर डॉक्टर व रुग्णालय यांना थेट मिळण्याची व्यवस्था निर्माण केली. एमआयएस सिस्टिम, जिऑग्राफिकल ट्रॅकिंग सिस्टिम असल्यामुळे ग्रामीण-दुर्गम भागातील गर्भवती महिलांना आरोग्य केंद्रावर तपासणीसाठी जावे लागणार नाही. आरोग्य सेविका किंवा  ‘आशा कर्मचारी’  संबंधित गर्भवती महिलेच्या घरी जाऊन चाचणी करू शकते आणि त्याचे अहवाल थेट डॉक्टरांना उपलब्ध होऊन ते आवश्यक ते मार्गदर्शन व उपचार करू शकतात. यामुळे कमी वजनाच्या बाळांची माहिती मिळू शकते, हाय रिस्क गर्भवती महिलांना वेळीच शोधून उपचार करता येऊ शकतो. आरोग्य सेविकांच्या माध्यमातूनही याची अंमलबजावणी करता येऊ शकते असे हे सोपे व सुटसुटीत उपकरण असल्याचे शंतनू यांनी सांगितले. या उपकरणाची चाचणीही २०१५ मध्ये यशस्वीपणे गोवंडी व देवनार येथे करण्यात आली. औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयाच्या वतीनेही ३६ गावांमध्ये १५०० गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीचा चाचणी उपक्रम राबविण्यात आला. या उपकरणाच्या माध्यमातून तीन हजारांहून अधिक चाचण्या यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.