पालिकेची नवी नियमावली जाहीर

मुंबई : करोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णांना रुग्णशय्या मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या रुग्णशय्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार यापुढे रुग्णाच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे का हे ठरवले जाणार आहे.

लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णशय्यांचे वाटप हे वैद्यकीय तपासणीनंतरच करण्याचे निर्देश पालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी दिले.  ही वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या घरी जाऊन केली जाणार आहे. करोना रुग्णांसाठीच्या रुग्णशय्या वाटपाबाबत अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी वरील आदेश दिले. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला पालिके चे सर्व अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. विभागस्तरीय नियंत्रण कक्षात येणाऱ्या दूरध्वनींची संख्या वाढली आहे. विभागस्तरीय नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांकाला ३० हॉटलाइन सुविधा एमटीएनएलकडून उपलब्ध करून घेण्याचे आदेश देण्यात आले.

सुरुवात रविवारपासून

लक्षणे वा तीव्र लक्षणे असणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याची मागणी ‘नियंत्रण कक्षा’कडे करण्यात आल्यानंतर अशा रुग्णांची महापालिकेच्या वैद्यकीय चमूद्वारे तपासणी केली जाणार आहे. गृहभेटीद्वारे करण्यात येणाऱ्या या वैद्यकीय तपासण्यांचे समन्वयन विभागीय नियंक्षण कक्षाद्वारे करण्यात येणार आहे. गृहभेटींद्वारे करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणींसाठी प्रत्येक विभागाच्या स्तरावर किमान १० तपासणी चमू व या प्रत्येक चमूसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था तात्काळ करवून घेण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले असून ही व्यवस्था येत्या रविवारपासून अमलात येणार आहे.

सकाळीच तपासणी

गृहभेटींद्वारे करण्यात येणारी रुग्णांची वैद्यकीय तपासणीची कार्यवाही ही सकाळी ७.०० ते रात्री ११.०० या कालावधी करण्यात येईल. रात्री ११.०० ते सकाळी ७.०० या कालावधीमध्ये एखाद्या रुग्णाची वैद्यकीय तपासणी तातडीने करणे गरजेचे असल्यास ती पालिकेच्या जम्बो कोविड उपचार केंद्रांमध्ये केली जाईल.

प्रतीक्षा यादी

अपवादात्मक संभाव्य परिस्थितीत एखाद्या रुग्णास वैद्यकीय चमूने ज्या प्रकारच्या रुग्णशय्येचे वितरण करण्याचे सुचविले आहे, त्या प्रकारची रुग्णशय्या उपलब्ध नसल्यास अशा रुग्णाला प्रतीक्षा सुचीवर ठेवण्यात येईल व काही तासांनी रुग्णशय्या उपलब्ध झाल्यानंतर रुग्णशय्येचे वितरण करण्यात येईल.