01 June 2020

News Flash

मध्य रेल्वेवर १४ डिसेंबरपासून नवे वेळापत्रक

मुख्य मार्गावरील लोकलचे वेळापत्रक सुधारण्यासाठी जवळपास ४० फेऱ्यांच्या वेळांत बदल करण्यावर भर दिला आहे

(संग्रहित छायाचित्र)

 

मुख्य मार्गावरील ४० लोकल फेऱ्यांच्या वेळामध्ये बदल

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा या मुख्य उपनगरीय मार्गावर १४ डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. गेल्या वर्षभरात नवीन मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची पडलेली भर आणि त्यामुळे लोकलचे बिघडलेले वेळापत्रक पाहता त्यानुसार उपनगरीय वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. लोकल वेळेत धावण्यासाठी वेळापत्रकात जवळपास ४० लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल केला आहे. या वेळापत्रकात प्रवाशांना नवीन फेऱ्यांचा दिलासा नसून फेऱ्यांचा विस्तारावरही अधिक भर दिलेला नाही.

मध्य रेल्वे मार्गावर ठाण्या पुढील म्हणजे दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ यासह आणखी काही स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वर्षांगणिक वाढत आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत असते. २०१५-१६ मध्ये १ हजार ६६० लोकल फेऱ्या असतानाच २०१८-१९ मध्ये याच लोकल फेऱ्यांची संख्या १ हजार ७७४ पर्यंत पोहोचली. तरीही प्रवाशांचा गर्दीच्या वेळचा प्रवास सुकर झालेला नाही.

ठाणे ते दिवा, कुर्ला ते परळ आणि सीएसएमटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग पूर्ण झाल्यास मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल व १०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांची भर पडेल. गेले दहा वर्ष सुरू असलेला प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मेल-एक्स्प्रेसना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होत नाही.

हा गोंधळ होत असतानाच गेल्या वर्षभरात नवीन राजधानी एक्स्प्रेसह आणखी काही मेल-एक्स्प्रेसची भर पडली. तर काहींच्या वेळा बदलल्या. मेल-एक्स्प्रेस व लोकल फेऱ्यांच्या एकच वेळांमुळे लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होत आहे. परिणामी जलदच काय तर धीम्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते.

मुख्य मार्गावरील लोकलचे वेळापत्रक सुधारण्यासाठी जवळपास ४० फेऱ्यांच्या वेळांत बदल करण्यावर भर दिला आहे. यातील काही फेऱ्या या दोन ते पाच मिनिटे आधी किंवा नंतर सोडण्याचे नियोजन केल्याचे सांगितले. त्यामुळे लोकल वेळेत धावणे शक्य होईल, असा दावा केला आहे. यामध्ये सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, खोपोली यासह अन्य लोकल फेऱ्यांचा समावेश आहे.

नवीन फेऱ्यांचे समाधान नाही

मध्य रेल्वे मुख्य मार्गावर नवीन फेऱ्यांचे समाधान प्रवाशांना मिळणार नाही. सध्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच १५० टक्के अधिक लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहे. तर नवीन मार्गिकाही उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन फेऱ्यांचा समावेश नाही. चार ते पाच नवीन फेऱ्यांशिवाय अधिक काही या वेळापत्रकात मिळणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

हार्बर व ट्रान्स हार्बरीवल वेळापत्रकाबाबत सांशकता

हार्बर व ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकल वेळापत्रकाऐवजी नवीन वेळापत्रकात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वेळापत्रकावरच भर देण्यात आला आहे. हार्बर व ट्रान्स हार्बवरील वेळापत्रकावर सध्या काम सुरू असून त्याचा १४ डिसेंबरच्या वेळापत्रकात समावेश करण्याबाबत सांशकता आहे. या मार्गावर नंतर नवीन वेळापत्रक लागू करण्याचा विचार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 2:39 am

Web Title: new schedule on central railway from 1st december akp 94
Next Stories
1 ठाणे वृक्ष प्राधिकरणाने झाडांच्या कत्तलीस दिलेली स्थगिती उठणार?
2 महाराष्ट्रातून दोन वर्षांत हत्तीरोग हद्दपार!
3 महापरिनिर्वाण दिनासाठी प्रशासन सज्ज
Just Now!
X