चिक्कीसारख्या अन्य पदार्थाच्या खरेदी कंत्राटासाठी नवी योजना आखण्यात आल्याची आणि तिची अंमलबजावणीही सुरू झाल्याची माहिती महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.
चिक्की घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते त्याचे काय झाले, याबाबत न्यायालयाने सरकारकडे विचारणा केली. त्यावर असे आदेश देण्यात आले नव्हते. मात्र अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडून चिक्कीची तपासणी करण्यात आली आणि ती खाण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले होते, अशी माहिती अणे यांनी न्यायालयाला दिली. नवी मुंबई येथील पत्रकार संदीप अहिरे यांनी यासंदर्भात याचिका केली असून याचिकेत पंकजा यांच्याकडून घोटाळ्यामुळे झालेले नुकसान वसूल करण्याची मागणी केली आहे. शिवाय अहिरे यांनी या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीद्वारे उच्चस्तरीय तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करण्याची मागणीही केली आहे.