१५ मार्चपर्यंत देयके स्वीकारणार ; वित्तीय शिस्तीसाठी उपाययोजना
अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला निधी वर्षभर उपलब्ध असतानाही मार्चअखेरलाच कोटय़वधी रुपयांच्या खर्चाची बिले सादर करणाऱ्या विभागांना व कार्यालयांना वित्त विभागाने चाप लावला आहे. १५ मार्चपर्यंत देयके कोषागरास सादर करण्याची मुदत राहील, याची सर्व विभागांनी नोंद घ्यावी, असे वित्त विभागाने कळविले आहे.
प्रत्येक वर्षांच्या अर्थसंकल्पात सर्व विभागांना निधी मंजूर केला जातो. तरीही आर्थिक वर्षांच्या अखेरीस म्हणजे मार्चअखेरच्या दोन-तीन दिवसांत मोठय़ा प्रमाणावर बिले सादर केली जातात. कोटय़वधी रुपयांची एकाच वेळी कोषागरांना बिले सादर केल्यामुळे त्यावर कार्यवाही करणे अशक्य होते. त्याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही त्यात काही सुधारणा होत नाही. बहुतांश विभागांकडून वित्तीय शिस्तीचे पालन केले जात नाही, असे वित्त विभागाने या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
या संदर्भात आता वित्त विभागाने १५ मार्चपर्यंत कोषागरांना बिले सादर करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीत प्रवास भत्ता, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, आस्थापनाविषयक पुरवणी देयके सादर करावीत, असे सर्व विभागांना कळविण्यात आले आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देयकांच्या मंजुरीचा विचार पुढील वर्षांच्या अनुदानातून केला जाणार आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.