‘लोकसत्ता लोकांकिके’त यंदा १३० महाविद्यालयांत चुरस

या स्पध्रेच्या प्राथमिक फेरीला २९ सप्टेंबरपासून राज्यभरात सुरुवात होणार आहे. तर महाअंतिम फेरी १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे.
महाराष्ट्राचे एक वैशिष्टय़ कोणते, असा प्रश्न विचारला, तर ‘नाटक करणाऱ्या नाटय़वेडय़ा लोकांचे राज्य’ हे उत्तर स्वाभाविकपणे मिळते. ही गोष्ट सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेनिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
यंदा राज्यभरातील आठही केंद्रांवर तब्बल १३० महाविद्यालयांनी लोकसत्ता लोकांकिकेसाठी आपला सहभाग नोंदवला आहे. आता या १३० महाविद्यालयांपैकी अव्वल आठ महाविद्यालयांच्या एकांकिका महाअंतिम फेरीसाठी निवडल्या जातील आणि त्यातून ठरेल महाराष्ट्राची ‘लोकांकिका’!
‘लोकसत्ता लोकांकिके’साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी संपली. या विहित मुदतीपर्यंत राज्यभरातील तब्बल १३० महाविद्यालयांनी आपले अर्ज सादर केले. म्हणजेच यंदाच्या वर्षांत तब्बल १३० नवीन विषयांवरील एकांकिका लिहिल्या गेल्या असून त्या सादरही होणार आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेमुळे राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांना व्यासपीठ मिळणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा राज्यभरात आयोजित करण्यासाठी ‘अस्तित्व’ या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी यंदा ‘रेडिओ पार्टनर’ म्हणून ९३.५ रेड एफएम, तर संपूर्ण स्पर्धेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’ काम पाहणार आहेत. त्याशिवाय या स्पर्धेत तावूनसुलाखून
निघणाऱ्या कलाकारांना पुढील संधी देण्यासाठी आयरिस प्रोडक्शन ‘टॅलेण्ट पार्टनर’ म्हणून काम पाहतील. ‘नॉलेज पार्टनर’
म्हणून स्टडी सर्कल सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे वेळापत्रक, नियम व अटी आणि इतर माहिती ६६६.’‘२ं३३ं.ूे/’‘ंल्ल‘्र‘ं2015 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेल्या वर्षी लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेला राज्यभरात भरघोस प्रतिसाद लाभला होता. यंदाही ही स्पर्धा चुरशीची ठरेल.