मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाला जोडणारा हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पूल दुरुस्तीसाठी नवीन मानके तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणच्या पूल दुर्घटनांवरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतले. या वेळी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर यापूर्वीच कारवाई केली असून सदस्यांचे आक्षेप लक्षात घेऊन नव्याने सर्वबाबी तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे उत्तरादाखल फडणवीस यांनी सांगितले. पूल दुरुस्तीसाठी आयआयटीने तयार केलेले तंत्रज्ञान लक्षात घेऊन नवीन मानके तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हिमालय पूल दुर्घटनाप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच या घटनेतील संबंधित उपायुक्तांवरही कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. विधान परिषदेत याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अनिकेत तटकरे, विद्या चव्हाण, विक्रम काळे आदींनी उपस्थित केला होता. हिमालय पूल प्रकरणी ज्या देसाई ऑडिट कंपनीची नियुक्ती केली त्यांचे मुंबईत कोठेही कार्यालय नाही. पुण्यात एक छोटेसे कार्यालय असून त्यांनी कोणतेही प्रत्यक्ष ऑडिट केले नसल्याचा पोलिसांचा अहवाल असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

‘लेखापरीक्षणाचे काम सुरू’

मध्यंतरी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनाही मुंबईतील ४४५ पुलांचे ऑडिट करण्याची घोषणा केली होती त्याचे नेमके काय झाले असा सवालही मुंडे यांनी केला. उत्तरादाखल मुख्यमंत्री म्हणाले, रेल्वे हद्दीतील पुलांचे ऑडिट रेल्वेने केले तर पालिकेच्या व एमएमआरडीएच्या हद्दीतील पुलांचे ऑडिट संबंधित यंत्रणांनी केले आहे. तथापि आयआयटीने तीन ते चार महिन्यांत पूल दुरुस्तीचे तंत्रज्ञान तयार केल्याचे सांगितल्यामुळे त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षणाचे काम सुरू असल्याचे तसेच नवीन मानके तयार करण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचप्रमाणे दहिसर येथील धोकादायक असलेला पादचारी पूल पाडण्यासाठी पालिका व एमएमआरडीएशी बोलून निर्णय घेण्यात येईल असेही स्पष्ट केले.