एटीएम यंत्रात ‘स्कीमर’ उपकरण लावून एटीएम कार्डचे ‘क्लोन’ करून पैसे काढण्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. परंतु घाटकोपरच्या अंमलीपदार्थ विरोधीशाखेच्या पथकाने एटीएममधून अनोख्या पद्धतीने पैसे काढणाऱ्या तिघांना पकडले आहे. या तिघांना पुढील तपासासाठी पंतनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
घाटकोपरच्या अंमलीपदार्थ विरोधी कक्षाला ‘एटीएम’मधून पैसे काढले जात असल्याची तक्रार मिळाली होती. त्याचा तपास करून त्यांनी हैदर शेख (२६) अख्तर शेख (२२) आणि ११ वर्षांच्या एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती देताना अंमलीपदार्थ विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रिकामे यांनी सांगितले की, हे त्रिकुट सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएम सेंटरमध्ये जायचे. एटीएमच्या यंत्राच्या स्टार किंवा हॅश बटनावर ते पारदर्शक सेलो टेप लावून ठेवायचे. त्यामुळे एटीएमची बटने (की-पॅड) बंद व्हायचे. एखादा ग्राहक एटीएम मध्ये जाऊन ‘पिन क्रमांक’ टाकून पैसे काढण्यासाठी रकमेचा आकडा टाकायचा. पण त्या सेलो टेपमुळे यंत्रणा बंद होऊन पावती यायची परंतु पैसे निघायचे नाहीत. याच वेळी या त्रिकुटातील एक जण त्याच्या मागे उभा असायचा आणि त्या ग्राहकाचा पिन क्रमांक चोरून टिपून घ्यायचा. मशीन नादुरूस्त समजून तो ग्राहक निघून गेल्यावर हे त्रिकुट आता यायचे आणि आपल्याकडील सोनेरी रंगाचे विशिष्ट कार्ड टाकायचे. त्यामुळे त्या ग्राहकाने टाकलेली रक्कम या त्रिकुटाला मिळायची. घाटकोपर परिसरातील तीन एटीएम सेंटरमध्ये हे त्रिकुट अशी शक्कल लढवून पैसे काढत असत अशी माहिती रिकामे यांनी दिली.
या तिघांना पंतनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून दोन महिन्यांपूर्वीच्या एका चोरीच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. अद्याप बँक वा कुणा ग्राहकाकडून तक्रार नसल्याने तसा गुन्हा नोंदविला नाही. आतापर्यंत अशा रितीने त्यांनी किती पैसे काढल़े, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन जगदाळे यांनी दिली.