शैलजा तिवले

शहरात आढळणाऱ्या बहुतांश करोनाबाधित रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे फुप्फुसांशी निगडित न आढळता अतिसार, जुलाब असे पोटाचे विकार, डोकेदुखी इत्यादी लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत. त्यामुळे कोणत्याही अन्य कारणांशिवाय अशी लक्षणे आढळल्यास तातडीने करोनाच्या चाचण्या करण्याचे तज्ज्ञांनी सूचित केले आहे.

आतापर्यंत करोनाबाधितांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही प्रमुख लक्षणे आढळून येत होती. त्यामुळे अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने चाचण्या करण्यासाठी स्वतंत्र बाह््यरुग्ण विभागही रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आले. परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राथमिक लक्षणांमध्ये काही अंशी बदल झाल्याचे दिसत आहे.

काय होतेय?

‘बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित आहेत. परंतु ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येतात, त्यात अनेकांना सुरुवातीला अतिसार, जुलाब असे पोटाचे विकार होतात आणि त्यानंतर त्यांना ताप येतो. यापूर्वी रुग्णांमध्ये सर्दी आणि ताप हीच लक्षणे प्रामुख्याने दिसत होती’, असे फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

सौम्य लक्षणांचे रुग्ण अधिक, परंतु…

आतापर्यंत रुग्णांमध्ये धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, न्यूमोनिया इत्यादी फुप्फुसांशी निगडित लक्षणे प्रामुख्याने दिसत होती. परंतु आता याव्यतिरिक्त इतर अवयवांवर करोनाचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. कोणत्याही कारणाशिवाय सतत तीव्र डोकेदुखी, रक्तामध्ये गुठळ्या झाल्याने धमनीतील रक्तप्रवाह खंडित होणे अशी काही लक्षणे निदर्शनास येत आहेत. तसेच काही रुग्णांमध्ये हृदयविकाराचा सौम्य झटका येणे, हृदयाचे ठोके वाढणे, छातीत अचानक खूप दुखणे असेही दिसून आले आहे.

‘पूर्वी बहुतांश रुग्णांमध्ये ताप येणे, वास नसणे, सर्दी ही लक्षणे आढळत होती. परंतु आता येणाऱ्या रुग्णांना खूप थकवा जाणवतो, तोंडाची चव जाते, सुका खोकला, जुलाब ही लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे काही अंशी लक्षणांमध्ये बदल झाल्याचे दिसून येते’, असे कूपर रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. नीलम रेडकर यांनी सांगितले. ही लक्षणे दिसल्यास तातडीने चाचण्या करणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळेत निदान होऊन उपचार सुरू होण्यास मदत होईल. तसेच झपाट्याने होणारा संसर्ग प्रसारही रोखता येईल, असा सल्ला वोक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि करोना कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी दिला आहे.