मुंबईतील प्रदूषण ७० टक्क्यांनी कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान
राज्यातील १० लाखपेक्षा अधिक लोकसंख्या आणि सर्वाधिक प्रदूषित अशा मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या १० शहरांचा आयआयटीमार्फत प्रदूषण नियंत्रण आराखडा तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून येत्या तीन महिन्यांत हे आराखडे तयार होतील. त्याचप्रमाणे मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी ५० जंक्शनवर ‘विंड ओग्मेंटेशन आणि प्युरिफाइंग युनिट’ बसविण्यात येणार असून त्यातून शहरातील प्रदूषण ७० टक्के कमी होऊ शकेल, असा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.
मुंबईमध्ये दिल्लीच्या धर्तीवर प्रदूषण कमी करण्याबाबत दीप्ती चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान कदम यांनी दावा केला. प्रदूषण कमी करण्यासाठी सम आणि विषम तारखेला वाहनांचा वापर करण्याबाबत दिल्लीत सरकारने राबविलेल्या उपक्रमातून प्रदूषण कमी झाल्याचा दावा फसवा आहे. ज्या काळात हा प्रयोग करण्यात आला त्यातून प्रदूषण कमी झालेले नसल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रयोग मुंबईत करण्याऐवजी अन्य उपाययोजनांच्या माध्यमातून मुंबईतील प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कदम यांनी सांगितले. केवळ वाहनांमुळे नव्हे तर कारखाने, कचरा, सांडपाणी, बांधकामे, उघडय़ावरील शौचालये, बेकरी यातूनही मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी सात लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे टप्प्याटप्प्याने प्रदूषण नियंत्रण कृती आराखडे तयार करण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.
मुंबईतही प्रदूषण वाढत असून त्याचे योग्य विश्लेषण होण्यासाठी १० किमीच्या परिसरात एक अशी प्रदूषण मापक यंत्रे बसविण्यात येणार आहेत. शहराच्या प्रदूषणात बांधकाम उद्योगाचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले असून १०३ सिमेंट मिक्सर प्लांट असून त्यातील २४ प्लांटना बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत,असे कदम यांनी सांगितले.

कचराभूमीवरून चर्चा फेटाळली
मुंबई :मित्रपक्ष भाजपकडून होणारी टीका टाळण्यासाठी महापौर स्नेहल आंबेकर यांनी देवनार कचराभूमीबाबत सभागृहात चर्चा करण्याची विरोधकांची मागणी मंगळवारी धुडकावून लावली. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घालत महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. या गोंधळाचा फायदा घेत महापौरांनी २०१६-१७ चा सुधारित अर्थसंकल्प मंजूर केला. त्यामुळे विरोधकांच्या संतापात भर पडली.

त्वरित श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
मुंबई : देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीमुळे मुंबईकरांचा जीव गुदमरत आहे. मात्र गेली २० वर्षे पालिकेत सत्ता उपभोगणारे शिवसेना-भाजप या प्रश्नावर केवळ परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते पर्यटनस्थळी जावे अशा अविर्भावात कचराभूमीला भेट देत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात हयगय करणाऱ्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मुंबईकरांची माफी मागावी आणि या प्रकरणी करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नि:पक्षपाती समिती स्थापन करावी, तसेच या समस्येवर तात्काळ श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी केली.

पोलीस आयुक्तांचे मदतीचे आश्वासन
देवनार कचराभूमीतील सुरक्षितता आणि तेथे सुरू असलेली कामे पार पडावी यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची भेट घेतली. याबाबत आयुक्तांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.