‘अपोलो रुग्णालय समूह’ आणि ‘टाटा समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टाटाएमडी चेक’ ही विषाणूंच्या जनुकीय रचनेवर आधारित (क्रिस्पर कॅस-९) करोना चाचणी करण्यात येणार आहे.

‘अपोलो डायग्नॉस्टिक्स’मार्फत डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून ही चाचणी राजधानी दिल्ली परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर कोलकाता, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या शहरांत ही तपासणी उपलब्ध होईल. ‘क्रिस्पर कॅस-९’ तंत्रज्ञानावर आधारित असलेली ‘टाटा एमडी चेक’ करोना चाचणी आठ रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे करोना चाचण्यांचा वेग वाढेल. यात सेन्सर्सचा वापर करून संचाच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. नमुने कुठून आले, त्याची माहिती आणि तपासणीचे परिणामही लगेच पाहता येणार आहेत.

मुंबईत ९२४ नवे रुग्ण

दिवाळीनंतर मुंबईतील रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी वाढली आहे. गुरुवारी ९२४ नवीन रुग्णांची नोंद झाली तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले असल्यामुळे सध्या केवळ ८,४७४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची दररोजची संख्या ७०० किंवा ५०० च्या आत होती. मात्र दोन दिवसांपासून तीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून आटोक्यात असलेली रुग्णसंख्या दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने दिवाळीनंतर पुन्हा एकदा चाचण्यांची संख्या वाढवली आहे. बुधवारी मुंबईत १५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. मात्र बाधित आढळण्याचे प्रमाण सध्यातरी १० टक्क्यांच्या आत आहे. आतापर्यंत १७ लाख २२ हजारांहून अधिक चाचण्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. गुरुवारी ११९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर सध्या केवळ ८४७४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ६३४ बाधित

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी ६३४ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची संख्या २ लाख २१ हजार ५३२ झाली आहे. तर, दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा  ५ हजार ५६८ झाला आहे.  जिल्ह्य़ात गुरुवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १९३, कल्याण-डोंबिवली शहरातील १८४, नवी मुंबईतील १७५, मीरा-भाईंदर  ५६, ठाणे ग्रामीणमधील ४१, उल्हासनगर  २९, अंबरनाथ २५, बदलापूर २१ आणि भिवंडीतील १० रुग्णांचा समावेश आहे. तर, गुरुवारी जिल्ह्य़ात १४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाणे शहरातील ५, कल्याण-डोंबिवलीतील ४, नवी मुंबईतील ३ तर भिवंडी आणि मीरा-भाईंदरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

राज्यात १५४ मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५,५३५ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर १५४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १७.६९ टक्के  करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. राज्यात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या १७ लाख ६३ हजार झाली आहे. तर मृतांची संख्या ४६,३५६ झाली आहे. राज्यात सध्या ७९,७३८ रुग्ण उपचाराधीन आहेत.  गेल्या २४ तासांत नाशिक जिल्हा ३३१, पुणे शहर ३५३, पिंपरी-चिंचवड १६७, उर्वरित पुणे जिल्हा २६९, सोलापूर १९८, सातारा २१८, नागपूर शहर ३०९ नवे रुग्ण आढळले.