अभिनेता सलमान खान आरोपी असलेल्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाला सोमवारी नवे वळण मिळाले. अपघातावेळी सलमान खान गाडी चालवत नव्हता तर मी चालवत होतो, अशी कबुली सलमान खानचा वाहनचालक अशोककुमार सिंह याने न्यायालयात दिली. अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो, असे आपण पोलीसांनादेखील सांगितले होते, अशीही माहिती त्याने न्यायालयात दिली. गेल्या आठवड्यात या प्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी सलमान खान याने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळताना अपघात घडला त्यावेळी आपण गाडी चालवत नव्हतो, असा युक्तिवाद केला होता. या पार्श्वभूमीवर अशोककुमार सिंह यांच्या कबुलीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या खटल्याची अंतिम सुनावणी एक एप्रिलपासून सुरू होणार आहे.
सलमान खान गेल्या शुक्रवारी स्वतःची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना गुन्हेगारी दंडसंहितेनुसार आरोपीला त्याची बाजू मांडण्याची अखेरची संधी दिली जाते. त्यासाठीच सलमान खान न्यायालयात हजर झाला होता. त्यावेळी त्याने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले होते. अपघात घडला, त्यावेळी आपण मद्यपान केले नव्हते, अशीही माहिती सलमानने न्यायालयात दिली.
मुंबईमध्ये २८ सप्टेंबर २००२ ला घडलेल्या या प्रकरणात सलमान खानच्या मोटारीखाली चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेत चार जण जखमी झाले होते. या प्रकरणात सरकारी वकिलांनी आतापर्यंत २५ साक्षीदारांना न्यायालयापुढे उभे करून विविध पुरावेही सादर केले आहेत. त्यानंतर न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी गुन्हेगारी दंडसंहितेच्या कलम ३१३ नुसार स्वतःची बाजू मांडण्यासाठी सलमान खानला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. या कलमानुसार न्यायालयात सादर झालेल्या विविध पुराव्यांसंदर्भात आरोपीला आपली बाजू मांडता येते. त्याचबरोबर न्यायालयही आरोपीला प्रश्न विचारू शकते.