शहरातील ‘मनसे’त असलेले नासके आंबे मी लवकरच काढून टाकणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. प्रत्यक्षात पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत जुन्या नासक्या आंब्यांबरोबर नवीन नासके आंबे भरण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. या नव्या कार्यकारिणीवरून मनसेत बंडाचे वारे वाहत असून या नाराज उपशहरअध्यक्ष, विभाग अध्यक्ष व उपविभाअध्यक्षांसह कार्यकर्त्यांना उद्या ‘कृष्णभुवन’वर राज भेटणार आहेत.
ठाणे शहर हे मनसेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पक्षबांधणी करण्याची जबाबदारी संपर्क अध्यक्ष गिरीश धानुरकर यांच्यावर सोपविण्यात आली. मात्र त्यांनी शहर अध्यक्षांपासून कोणालाच विश्वासात न घेता ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नव्हता तसेच पैसेवाल्यांना पदांच्या खिरापती वाटल्याचा आक्षेप ठाण्यातील पदाधिकारी घेत आहेत. ज्यांच्याकडे यापूर्वी दोन ते चार पदे होती अशा अविनाश जाधव, राजेश मोरे यांनाच नव्या रचनेत वरिष्ठ पदे देण्यात आली. विद्यार्थीसेनेची कोणतीच जबाबदारी पार न पाडलेल्या जाधव यांना बढती का दिली हा जसा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे पक्षाशी काहीच संबंध नसलेल्या रमेश मढवी यांना थेट नौपाडा विधानसभा विभाग अध्यक्ष तर याच विभागात राष्ट्रवादीतून आलेल्या प्रदीप सावर्डेकर यांना शहर सचिव केले आहे. शहर कार्यकारिणीच्या नियुक्तीमध्ये विद्यमान २१ विभाग अध्यक्षापैकी तसेच ४० उपविभाग अध्यक्षांपैकी एकही व्यक्ती लायक नव्हती का, असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी केला. मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या रवी मोरे व  एका सरचिटणीसाच्या मर्जीतील सुधीर बुबेरा यांची कळवा प्रभागात नियुक्ती केली. मनोहर सुखदरे यांच्यासह ज्यांचा कार्यकारिणीमध्ये समावेश झाला आहे त्यासाठी केवळ ‘धनशक्ती’ हाच निकष धानुरकर यांनी लावला असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.