‘महल’ या १९४९मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात मधुबाला नावाच्या सर्वागसुंदर स्वप्नाने एका मखमली आवाजात ‘आयेगा आनेवाला’ अशी साद घातली आणि लता मंगेशकर नावाचे युग चित्रपट संगीतात आणि पर्यायाने चित्रपटसृष्टीत अवतरले. लताजींनी ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ जमान्यात अनेक नायिकांना आपला आवाज दिला आणि अनेक गाणी अजरामर झाली.
आता ही आठवण लता मंगेशकर यांनीच आपल्या वार्षिक दिनदर्शिकेच्या निमित्ताने ताजी केली आहे. लता मंगेशकर यांची २०१३ची वार्षिक दिनदर्शिका गुरुवारी प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाली.
मे २०१४ पर्यंत असलेल्या या दिनदर्शिकेत लताजींनी कृष्णधवल जमान्यात ज्या नायिकांसाठी आपला आवाज दिला, त्यांची छायाचित्रे या दिनदर्शिकेवर असणार आहेत. त्याचप्रमाणे लताजींची प्रत्येक नायिकेबद्दलची आठवणही या दिनदर्शिकेत समाविष्ट केली आहे.
या दिनदर्शिकेत मुमताज, हेमामालिनी, नर्गिस, मधुबाला, नूतन, मीनाकुमारी अशा अभिनेत्रींची छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.