करोना संकटानं ग्रासलेलं २०२० वर्ष आता शेवटच्या औटघटका मोजत आहे. दोन दिवसांत हे वर्ष निरोप घेईल आणि नव्या वर्षाचा उदय होईल. भीती, निराशा, दुःखाने व्यापून गेलेल्या या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. नव्या वर्षात मुंबई पुन्हा एकदा पूर्वीसारखी सुसाट धावेल, या आशेत मुंबईकरही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत. मात्र, करोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही, याची जाणीव करून देत मुंबई पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतामुळे आनंद व हर्षाचे वारे वाहताना दिसत आहे. सगळीकडे सेलिब्रेशनचे प्लॅन तयार झाले आहेत. होत आहेत. मात्र, करोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नसल्यानं आणि त्यातच करोनाचे दोन नवीन प्रकार आढळून आल्यानं मुंबई पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. नाताळ आणि नव वर्षांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या शहरांत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलेला असून, मुंबई पोलिसांनीही त्याची आठवण करून दिली आहे.

“सुरक्षेला ‘सलाम नमस्ते’ म्हणा, कोरोनाला नाही! रात्री ११ च्या आत पार्टी संपवा- आम्हाला ‘व्हॉट्स गोइंग ऑन’ विचारण्याची संधी देऊ नका,” असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

करोनाचे दोन नवीन प्रकार आढळून आल्यानंतर भारतासह अनेक देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. राज्य सरकारनंही मुंबईसह महत्त्वाच्या महानगरांमध्ये नाईट कर्फ्यूसह गर्दी टाळण्यासाठी आदेश काढले आहेत. नागरिकांनी नववर्ष खबरदारी घेऊन साजरं करण्याचं आवाहनही सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे.