नववर्ष स्वागताचे मुंबईतील चित्र

नववर्षांच्या निमित्ताने शहरातील किनारे, रस्ते, उपाहारगृहे गर्दीने खचाखच भरलेली असतानाच उच्चभ्रूंचे पब, बार आणि उपाहारगृहांमध्ये मात्र शुकशुकाट होता. कमला मिलमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने दोन दिवसांत हजाराहून अधिक पब, उपाहारगृहांची केलेली झडती व सातशेहून अधिक अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडल्याने नवीन वर्षांसाठी सजलेल्या पब आणि बारचा व्यवसाय थंड होता. पालिकेने सुरू केलेल्या कारवाईचा धसका घेत अनेक पब आणि बारमालकांनी पाटर्य़ाचे नियोजन रद्द केले. नववर्षांचे स्वागत करण्यासाठी लोक सुरू असलेल्या पब, बारचा शोध घेत होते, तर मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळे गर्दीने फुलून गेली होती.

कमला मिलमध्ये घडलेल्या दुघर्टनेच्या पाश्र्वभूमीवर पालिकेने रविवारीदेखील हॉटेलांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा सुरू ठेवल्याने नववर्षांच्या स्वागत पाटर्य़ाच्या उत्साह मावळला होता. कमला मिलबरोबर रघुवंशी मिल, माथुरदास मिल येथील हॉटेलांवरही तडक कारवाई केल्याने येथील पब आणि बारमालकांनी स्वागतपाटर्य़ाचे आयोजन बासनात गुंडाळले होते.

रघुवंशी मिलमधील ‘पिनाकिन’, ‘फ्युमस- शिशा लाऊंज’ यांच्यासह बार आणि पब मालकांनी आगाऊ स्वरूपात केलेले पाटर्य़ाचे आरक्षण रद्द केले. तसेच आयोजनानिमित्ताने ग्राहकांकडून घेण्यात आलेली अनामत रक्कमही त्यांना पुन्हा देण्यात आली होती. त्यामुळे मध्य मुंबईतील पब आणि बारमध्ये पार्टी करण्याच्या उत्साहात आलेल्या लोकांना माघारी जावे लागले. मात्र उपनगरातील अंधेरी आणि वांद्रे येथील काही पब आणि बारमध्ये नववर्षांच्या स्वागताचा उत्साह दिसत होता. कारवाईचा हातोडा न पडलेल्या येथील पब आणि बारमालकांनी पाटर्य़ाचे जंगी आयोजन केले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईत हिरमोड झालेल्या उत्साही मंडळींनी उपनगर गाठले होते.

पब आणि बारमालकांनी पाटर्य़ाचे आयोजन ऐन वेळी रद्द केल्याने त्याचा फायदा उपाहारगृहांना झाला. नवीन वर्षांच्या स्वागतासोबत विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी उपाहारगृहांबाहेर गर्दी केली होती. विशेषत: पर्यटन स्थळे आणि समुद्र चौपाटय़ांचा परिसरात असलेली उपाहारगृहात गर्दी लोटली होती. मॉलमध्येही लोकांनी गर्दी केली होती. यात सामान्य मुंबईकरांनी मात्र पर्यटन स्थळांना भेट देऊन नववर्षांच्या उत्साह साजरा केला. त्यामुळे मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळे गर्दीने बहरून गेली होती.

पोलीस बंदोबस्त

गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, वांद्रे कार्टर रोड, बॅण्ड स्टॅण्ड, जुहू चौपाटी, शिवाजी पार्क परिसर हा नववर्षांचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या लोकांनी भरून गेला होता. मरिन ड्राइव्ह तरुणाईचा सळसळता उत्साह दिसत होता. कोणी ‘केक’ कापून, तर कोणी त्याच ठिकाणी छोटेखानी पार्टी करून नववर्षांच्या स्वागताचा आनंद लुटत होता. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ या ठिकाणीदेखील पोलीस पर्यटकांची तपासणी करून त्यांना या परिसरात प्रवेश देत होते. गर्दी जमलेल्या सर्वच पर्यटन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

कमला मिल ओस

दुर्घटनेनंतरही शनिवारी थोडय़ा फार प्रमाणात गजबजलेला कमला मिल परिसर रविवारी ओस पडलेला दिसत होता. दरवर्षी वर्षांच्या अखेरच्या दिवशी गर्दीने भरुन जाणारा परिसर मात्र २०१७ च्या शेवटच्या दिवशी मोकळा दिसत होता. पालिकेने केलेल्या कारवाईमुळे परिसरात बांधकामाचा कचरा जमा झाला होता. येथील गॅण्डमामास कॅफे, प्ले द लाऊंज, प्रवास या पब आणि हॉटेलांवर कारवाई झाल्याने याठिकाणी पाटर्य़ाचा उत्साह मावळला होता. रविवारी असल्याने कार्यलयीन कामकाजाला सुट्टी असल्याने परिसरात शांतता होती. केवळ कामा, तलाईवा, स्टारबक्स ही हॉटेल सुरू होती.