‘आशियातील सर्वात आकर्षक न्यू इयर पार्टी’ अशा जाहिरातीला भुलून हजारो रुपये मोजून गेलेल्या लोकांच्या पदरी निराशा पडली. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलच्या आवारातील ही नववर्षांची पार्टी गलथान व्यवस्थापनामुळे मध्येच बंद पडली. या पार्टीच्या आयोजकांविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मकाऊ मिडनाईट मॅडनेस’ या नावाने नवीन वर्षांच्या स्वागतासाठी एका पार्टीचे आयोजन ‘पर्पल स्टोन एण्टरटेनमेंट’ या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे करण्यात आले होते. जुहूच्या बंद पडलेल्या टय़ुलिप स्टार या पंचतारांकित हॉटेलात या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी बॉलिवूडसह आंतराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले डीजे येणार असल्याचे जाहिरातीत नमूद केले होते. पार्टीची तिकिटे इंटरनेटद्वारे ऑनलाइन विकण्यात आली होती. २ हजारांपासून अगदी ८ हजारांपर्यत या पार्टीची तिकिटे विकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रात्री ८ पासून उत्साही मंडळी पार्टीसाठी जमायला सुरवात झाली होती. मात्र तेथील व्यवस्था अतिशय ढिसाळ होती. ३ हजार लोकांची क्षमता असूनही ६ हजार जण आले होते. पार्टीच्या ठिकाणीही प्रत्येकी ५ हजार रुपये दर आकारून तिकिटे देण्यात येत होती. प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे गोंधळात अधिकच भर पडला. काही वेळ संगीत सुरू झाले, पण नंतर ते बंद पडले. अखेर संतप्त झालेल्या अनेकांनी पार्टीतून काढता पाय घेतला. काही वेळातच पार्टीही बंद करण्यात आली.
सहभागी झालेल्यांच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हॉटेल आणि आयोजकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण चव्हाण यांनी दिली. आम्ही महागडे तिकिटे काढून आलो होतो, पण आमची घोर निराशा झाली, असे एक तक्रारदार निखिल दोशी याने सांगितले. मी कुटुंबियांसाठी १३ हजारांची तिकिटे घेतली होती. पण पार्टीत नुसता गोंधळ होता, असा नाराजीचा सूर रिना देवनानी (४०) या डॉक्टर महिलेने काढला.