एकीचे नाव बिजली, तर दुसरीचे मस्तानी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलेल्या दोन वाघिणींचे नुकतेच नामकरण करण्यात आले असून एका वाघिणीचे नाव ‘बिजली’ व दुसरीचे ‘मस्तानी’ असे ठेवण्यात आले आहे.

बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात पेंच, नागपूर येथून दोन वाघिणी या महिन्यात आणण्यात आल्या होत्या. त्यांना येथील व्याघ्र सफारीत सोडण्यात येणार असून सध्या त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले आहे.

आजवर त्यांना ‘टीएफ १’ व ‘टीएफ २’ या नावांनीच ओळखण्यात येत होते. मात्र, आता त्यांची शुश्रृषा करणारे कर्मचारी व उपचार करणारे डॉक्टर यांच्याशी त्या जुळवून घेत असल्याने त्यांची आता कायम ओळख ठरवण्यात आली असून दोघींपैकी स्वभावाने आक्रमक असलेल्या वाघिणीला ‘बिजली’ असे नाव देण्यात आले. तर, स्वभावाने शांत असलेल्या दुसऱ्या वाघिणीला ‘मस्तानी’ असे नाव देण्यात आले आहे. असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. येत्या नोव्हेंबर ते डीसेंबर महिन्यात या वाघिणींना उद्यानातील व्याघ्र सफारीत सोडून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सैराट’ या चित्रपटातील पात्रांचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. या वाघिणींपैकी एका वाघिणीचे नाव ‘आर्ची’ ठेवावे अशी मागणी करण्यात येत होती.मात्र शैलेश पेठे यांनी हा आग्रह धुडकावून लावला.