पालिका रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ७२९ रिक्त पदांसाठी सुयोग्य उमेदवार मिळत नसल्याने उपनगरांतील पालिकेशी सलग्न असलेल्या रुग्णालयांतील आरोग्य सेवा राज्य सरकारच्या मदतीने बळकट करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि संशोधन विभागाकडून (डीएमईआर) उपलब्ध होणाऱ्या ५०० नवोदित डॉक्टर्सना सहा महिने आपल्या मुख्य रुग्णालयात, तर सहा महिने उपनगरीय रुग्णालयात सेवा देण्यासाठी पाठविण्याचा विचार पालिका करीत आहे.
पालिका रुग्णालयांमध्ये आजघडीला वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७२९ पदे रिक्त आहेत. ५० हजार रुपये वेतन देऊनही पालिकेच्या सेवेत रुजू होण्यास वैद्यकीय अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे उपनगरांतील सलग्न रुग्णालयांमधील रुग्ण सेवेवर परिणाम होत आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ‘डीएमईआर’कडे नोंदणी केलेल्या डॉक्टरांना पालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयामध्ये एक वर्षांसाठी पाठविले जाते. या डॉक्टरांच्या मदतीने उपनगरांतील सलग्न रुग्णालयांमधील आरोग्य सेवा बळकट करण्याचा पालिकेचा मानस आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
पालिकेच्या मुख्य रुग्णालयांमधील एक वर्षांच्या अनुभवाच्या शिदोरीमुळे प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे केईएम, शीव अथवा नायरमध्ये आपल्याला संधी मिळावी यासाठी नवोदित डॉक्टर इच्छुक असता. ‘डीएमईआर’कडून पाठविण्यात येणाऱ्या डॉक्टरना सहा महिने मुख्य रुग्णालयांत म्हणजे केईएम, शीव अथवा नायर आणि उर्वरित सहा महिने उपनगरांतील रुग्णालयात सेवा द्यावी लागेल. मात्र आता नव्या निकषानुसार सहा महिने मुख्य, तर सहा महिने उपनगरांतील रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना केईएम, शीव अथवा नायर रुग्णालयाचेच प्रमाणपत्र देण्याचा विचार आहे, असेही संजय देशमुख म्हणाले. यामुळे डॉक्टरांनी कमतरता काही प्रमाणात कमी करण्याचा पालिकेचा विचार आह़े

१०० कोटींचा बोजा
पालिका रुग्णालयांमध्ये परिचारिका, वॉर्डबॉय, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची पदे मोठय़ा प्रमाणावर रिक्त आहेत. लवकरच ही पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. रिक्त पदांचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी पालिकेच्या तिजोरीवर १०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, असे संजय देशमुख म्हणाले.