डॉकयार्डप्रकरणी पालिका आयुक्तांना न्यायालयाचे समन्स
मुंबई : डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडईतील सेवानिवासस्थानाची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महानगर दंडाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा, मनीषा पाटणकर-म्हैसकर आणि मोहन अडताणी यांच्यावर समन्स बजावले असून, १२ जानेवारी २०१५ रोजी या चौघांनाही न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
बाबू गेनू मंडईमधील बाजार विभागातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवासस्थान असलेली इमारत २७ सप्टेंबर २०१३ रोजी कोसळली आणि त्यात कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक असे ६१ जण ठार, तर ३१ जण जखमी झाले. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी याविरुद्ध महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. शरद राव यांच्यासह बाधित कामगार संजय वाघमारे आणि संजय गुरव यांची महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे साक्ष झाली.

कर्ज देण्याच्या नावाने कोटय़वधीचा गंडा
मुंबई: कंपनीला २ हजार ७०० कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने सुमारे ६ कोटी रुपयांची फसवणुक केल्याची घटना गोरेगाव येथे उघडकीस आली आहे.
महेंद्र जैन हे गुंदेचा ग्रुप ऑफ कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीला मोठय़ा रकमेचे कर्ज हवे होते. आदित्या इंडिया फायनान्स सव्र्हिसेस लिमिटेड ही कंपनी कर्जपुरवठा करण्याचे काम करते. या कंपनीतून २ हजार ७०० कोटी रुपयांचे कर्ज २४० महिन्यांसाठी देण्याचे आश्वासन दोघांनी दिले होते. या कर्जाची प्रोसेसिंग फी, स्टॅंप डय़ुटी आणि रजिस्ट्रेशन फी बॅंकेच्या खात्यात भरल्यास दर कमी लागेल असे या दोघांनी सांगितले होते. गुंदेचा कंपनीने पैसे भरल्यानंतर त्यांची फसवणूक करण्यात आली होती. पोलीस  फरार असलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.

रॉकेट लाँचर सापडले
मुंबई: सरावासाठी वापरण्यात येणारे नौदलाचे एक रॉकेट लाँचर कुलाब्याच्या ससून डॉक येथे सापडले. मात्र ते निकामी असल्याने त्याचा कुठलाच धोका नसल्याचे नौदलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कुलाब्याच्या ससून डॉक येथे मंगळवारी दुपारी गवताजवळ एक रॉकेट लॉन्चर आढळल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच नौदल अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. असे डमी रॉकेट लाँचर नौदलातर्फे सरावासाठी समुद्रात वापरले जाते. या रॉकेटचा वापर झाल्याने ते निकामी होते तसेच त्यात ज्वलनशील पदार्थ नसल्याचे नौदलाने स्पष्ट केले. नौदलातर्फे महिन्याभरात समुद्रात सराव केला जातो.

मालाडमध्ये महिलेची गळा चिरून हत्या
मुंबई: मालाडमध्ये उच्चभ्रू सोसायटीत एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मालाड पोलीस याप्रकरणी गुड्डू नावाच्या एका व्यक्तीचा शोध घेत आहेत.
शगुफ्ता खान (३२) ही महिला मालाड पश्चिमेच्या रुस्तमजी रायवीरा या इमारतीत सहाव्या मजल्यावरील सी विंगमधील ६४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये दोन मुलींसह राहात होती. तिचे पती सोनू जलान हे ऑस्ट्रेलियात कामानिमित्त असतात. मंगळवारी दुपारी शगुफ्ता यांची १३ वर्षांची मुलगी शाळेतून घरी परतली तेव्हा आई बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळली. त्याच वेळी गुड्डू नावाचा इसम इमारतीमधून बाहेर पडत असताना तिने पाहिला होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शगुफ्ता यांचा गळा चाकूने चिरण्यात आलेला होता. कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त झाल्या होत्या. मारेकऱ्याने कपाटातील हिरेजडित सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकडही लंपास केली आहे.

दूधवाला दरोडेखोर
मुंबई: दूधवाल्याने घरात कुणी नसल्याचे पाहून १२ लाखांचा दरोडा घातल्याची घटना पायधुनी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी या त्याला अटक केली आहे. पायधुनीच्या अलका मेन्शन इमारतीत अरिफ सेलर हे व्यापारी राहतात. त्यांच्याकडे अब्दुल गफार अब्दुल रेहमान पटली (४५) हा  सकाळी पिशवीचे दूध देण्याचे काम करत होता, मात्र ७ नोव्हेंबरला सेलर हे पुण्याबाहेर गेले होते. ती संधी साधून अब्दुलने ८ नोव्हेंबरच्या सकाळी सेलर यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील रोख रक्कम आणि दागदागिने असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज लुटला. पायधुनी पोलीस याप्रकरणी तपास करत होते. त्याच्याकडून चोरलेला ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पायधुनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कवळेकर यांनी दिली.

दोन पोलीस अधिकारी विनयभंगप्रकरणी अटकेत
प्रतिनिधी, मंबई
लोणावळ्याचे पोलीस उपअधीक्षक आणि साहाय्यक पोलीस निरीक्षकाला मुंबईत एका महिलेच्या विनयभंगाप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. नंतर न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली.
 पुणे ग्रामीणमधल्या लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक वैभव काळुभरमे आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील मुंबईत कामानिमित्त आले होते. दुपारी काम संपल्यावर ग्रँट रोड येथील कृष्णा पॅलेस या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. या वेळी पीडित महिला आपल्या पती आणि इतर मित्रांसह वाढदिवस पार्टी साजरी करण्यासाठी आली होती. या हॉटेलच्या एका सभागृहात पार्टी होती, तर दुसऱ्या सभागृहात खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पीडित महिला सभागृहाबाहेर उभी असताना काळुभुरमे आणि येडे पाटील यांनी या महिलेची छेड काढली. त्या वेळी महिलेचा पती आणि त्यांच्या मित्रांनी या दोघांना मारहाण केली. त्यानंतर या दोघांनी हॉटेलमधून काढता पाय घेतला. परंतु पाटील यांचे ओळखपत्र हॉटेलच्या आवारात पडले होते. त्यावरून महिलेने या दोघांविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांना विनयभंग प्रकरणात अटक केली. न्यायालयाने या दोघांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली.