ऑनलाइन आणि मोबाइलच्या माध्यमातून पैसे खर्च करण्याची सवय वाढत असली तरी आजही आपण अनेक बिले ऑफलाइन अर्थात रोखीने भरतो. यात प्रामुख्याने समावेश होतो तो दूध, पेपर, केबल या सुविधा पुरविणाऱ्या लोकांचा. एका आकडेवारीनुसार मुंबई प्रसिद्ध होणाऱ्या २० प्रमुख प्रकाशनांच्या विक्रीतून दरमाह साधरणत: ८०० कोटी रुपयांची उलाढाल होते, तर हीच आकडेवारी महाराष्ट्राची पाहिली तर २००० कोटी आणि संपूर्ण देशाची २५ हजार कोटी इतकी होते. म्हणजे हे व्यवहार आजही रोखीने होत आहेत. या व्यवहारांना शिस्त लावण्यासाठी आणि ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील नीरज तिवारी या तरुणाने ‘वन वॉलेट’ नावाची कंपनी सुरू केली आणि या असंघटित क्षेत्रातला एक दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केला. यामुळे आजपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पेमेंट वॉलेट्सपेक्षा वेगळाच पर्याय समोर उभा ठाकला आहे आणि यातून ऑनलाइन व्यवहाराला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर एका संकेतस्थळामध्ये नोकरी करत असताना नीरजने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने टी नेटवर्क नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून संकेतस्थळ बनवून देण्यास सुरुवात केली. या कंपनीचे काम सुरू असताना एक दिवस नीरज यांच्या घरी पेपरविक्रेता बिल घेण्यासाठी आला त्या वेळेस त्याने सांगितले की, तुमचे दोन महिन्यांचे बिल बाकी आहे. या वेळेस नीरजला सुचले या लोकांचा हिशेब ठेवण्यासाठी काहीच सुविधा उपलब्ध नाही. याचबरोबर त्यांना घरोघरी फिरून पैसे जमा करावे लागतात. यामुळे अशा लोकांसाठी काही तरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्यांनी विचार करण्यास सुरुवात केली. हा विचार करत असताना वन वॉलेटची संकल्पना समोर आली आणि नीरजने ती अमलात आणण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी टी नेटवर्क नावाची कंपनी बंद केली आणि नवीन कामास सुरुवात केली. पेपरवाल्यांना नेमके काय हवे आहे, त्यांचे काम कसे चालते इथपासून सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तब्बल सहा महिने नीरज आणि त्याच्या चमूने पेपरवाल्यांसोबत प्रत्यक्ष काम केले. यानंतर त्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही सुविधा सुरू केली.
वन वॉलेटमध्ये नोंदणी केलेल्या पेपरविक्रेत्यांच्या ग्राहकांचा सर्व तपशील कंपनीने गोळा केला. यामध्ये ग्राहकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ते कोणता पेपर घेतात याचा तपशील याची नोंद करून घेण्यात आली. यानंतर एक अ‍ॅप तयार करून त्यामध्ये ही सर्व माहिती भरण्यात आली. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला आणि पेपरविक्रेत्याला कोणत्याही वेळी पेपर बिल किती झाले आहे याची माहिती मिळू शकते. जर ग्राहक गावाला गेला आणि त्याने काही दिवस पेपर घेतला नाही, तर त्याची नोंदही ऑनलाइन घेतली जाते. त्यामुळे त्या दिवसांच्या पेपरची रक्कम वजा करून नंतर बिल तयार होते. बिल तयार झाल्यावर दर महिन्याच्या एक तारखेला ग्राहकांना लघुसंदेश जातो आणि ते अ‍ॅपच्या माध्यमातून पेपरचे बिल तयार करू शकतात. पेपरविक्रेत्यांसोबत केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून त्यांना आत्तापर्यंत तब्बल ११० पेपरविक्रेत्यांनी साथ दिली आहे. या प्रयोगानंतर दूध विक्रेत्यांनाही हीच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढे केबलचालकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कामातून कंपनीकडे इतकी माहिती तयार झाली, की त्याआधारे ते केवळ एखाद्या इमारतीमधील लोकांनाच लघुसंदेश पाठवायचा असेल तर तसाही पाठवू शकता. या तंत्रासाठी कंपनी स्वामित्व हक्कासाठीही प्रयत्न करणार असल्याचे नीरजने सांगितले. याचबरोबर यामध्ये आणखी एक सुविधा देण्यात आली आहे, ती म्हणजे दूध विक्रेता, पेपर विक्रेता, केबलचालक, इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या अशा विविध कंपन्यांना आपण दरमाह किती पैसे देतो तेवढी एकत्रित रक्कम आपण वन वॉलेटमध्ये जमा केली की महिन्याच्या एक तारखेला ती त्या-त्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था कंपनीतर्फे करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना घरबसल्या बिल भरणा करणे शक्य होणार आहे.

अशी आली गुंतवणूक
सुरुवातीला नीरजने स्वत:च्या खिशाला कात्री लावून कंपनीत पैसे गुंतविले. यानंतर त्याला ७० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. आता जाहिरातींच्या माध्यमातून निधी उभा करण्याचा नीरजचा मानस आहे. याचबरोबर वॉलेटमध्ये शाळेचे शुल्क भरण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. यातील काही सुविधांवर मोबदला घेऊन कंपनीचे उत्पन्न सुरू झाल्याचे नीरजने सांगितले.

भविष्यातील नियोजन
भविष्यात ही सेवा अधिकाधिक विक्रेत्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी कंपनीत सध्या ३५ कर्मचारी काम करत आहेत.

नव उद्यमींना सल्ला
सध्या देशात नवउद्योगांना पोषक वातावरण असले तरी नव उद्योग सुरू करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा तो म्हणजे एका महिन्यात मी इतके पैसे कमावणार अशी मानसिकता असता कामा नये. तातडीने पैसे कमवायचे असतील तर नवउद्योगाच्या फंदात पडू नका, असा सल्ला नीरजने दिला. याचबरोबर कंपनी सुरू करत असताना निधीची उभारणी करण्याचेही महत्त्वाचे आव्हान असते, त्याशिवाय आपण उद्योग चालवू शकत नसल्याचे त्याने सांगितले.

नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com