आवश्यक ती माहिती जनमानसापर्यंत पोहोचविणारी, अन्यायाला वाचा फोडणारी ‘वृत्तपत्रे’ अत्यावश्यक सेवेत मोडत असून करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमधून वृत्तपत्रांची छपाई, विक्री आणि वितरणावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांना सहकार्य करण्याची सूचना राज्य सरकारने केलेली असतानाही काही ठिकाणी कारवाईचा बडगा उगारल्याने विक्रेते आणि संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद होत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्य सरकारने १५ दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार राज्यात १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या कडक निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून त्यात ‘वृत्तपत्र वितरक आणि व्यवसायाशी संबंधित घटकांनाही वगळण्यात आले आहे. परिणामी, वृत्तपत्रांची कार्यालये आणि छपाईखाना सुरू ठेवण्याची मुभा आहे. तसेच वृत्तपत्र वितरणास परवानगी असल्यामुळे स्टॉलवर वृत्तपत्रांची विक्री करता येते. तसेच वृत्तपत्रांशी निगडित सर्व विक्रेते तसेच कर्मचाऱ्यांना बेस्ट बस, रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे. पालिका आणि पोलिसांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना सहकार्य करावे, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.

स्टॉलवर वृत्तपत्र विक्रीस परवानगी नाही असा गैरसमज झाल्यामुळे काही ठिकाणी प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचा झाल्यामुळे त्यांचा विक्रेत्यांशी वाद झाल्याच्या घटना घडल्या; परंतु वृत्तपत्र वितरणासह स्टॉलवर बंदी नसल्याचे सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

करोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून स्टॉलवर वृत्तपत्रांची विक्री करण्यात येत आहे. मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. स्टॉलवर येणारे ग्राहक वृत्तपत्र खरेदी करून निघून जातात.