विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात यावी, असा दावा काँग्रेस व राष्ट्रवादीने केला असतानाच आधी विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा मार्ग मोकळा करा, मगच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेऊ, अशी खेळी सत्ताधारी भाजपने केली आहे. सत्ताधारी भाजपच्या या खेळीने काँग्रेसला उपसभापतीपदावरील दावा मागे घ्यावा लागणार आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसने गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली. यानुसार काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ८० आमदारांनी वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर यथावकाश निर्णय घेऊ, असे बागडे यांनी जाहीर केले. सभागृहाचे कामकाज संपल्यावर अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांची बैठक झाली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अवलंबून आहे. उपसभापतीपदाचा निर्णय लवकर घेतला जावा, अशी सत्ताधाऱ्यांची मागणी होती. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत मार्ग निघाल्यास विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला जाईल, असे विरोधकांना  सांगण्यात आले.

श्रेष्ठींशी चर्चा करणार

विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एका सदस्याचा फरक आहे. यामुळे निवडणूक घेण्याची काँग्रेसची भूमिका होती. मतांचे गणित जुळण्याबाबत विरोधक  साशंक आहेत. यामुळेच काँग्रेसने उपसभापतीपदावरील दावा मागे घ्यावा. म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळू शकेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले.  दिल्लीतील नेत्यांशी बोलून काँग्रेस नेते यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.