कर्करोगाने जर्जर झालेल्या कविताची बहीण सीमा गेले दोन आठवडे टाटा कर्करोग रुग्णालयाच्या समोरील फूटपाथवर आपल्या आईसोबत राहत आहे. ओरिसामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या सीमाची आर्थिक परिस्थिती बेताची. मुंबईत ना घर ना दार, नातेवाईक ही नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुंबईमधील खोल्यांचे भाडेही तिच्या कुटुंबाला परवडणारे नाही. त्यामुळे ‘फुटपाथची माझे घर’ मानून उन्हाळ्यातील कडक उन्हाचा, कधी कुत्र्यांचा त्रास सहन करीत राहत आहे. वयस्कर आईला घेऊन फुटपाथवर राहावे लागते याचे दु:ख आहे. मात्र आपल्या बहिणीचा आजार लवकर बरा व्हावा हे महत्त्वाचे असून त्यासाठी ती रोज देवाजवळ प्रार्थना करते. ही व्यथा फक्त सीमा आणि तिच्या कुटुंबाची नसून तिच्यासारखे हजारो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची हीच परिस्थिती आहे. परप्रांतातून केमोथेरेपी आणि अन्य तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचीदेखील हीच अवस्था आहे. थंडी, ऊन, वारा, पाऊस असतानाही फूटपाथवरच अंथरून घालून झोपायचे, कारण राहण्याचा दुसरा पर्यायच नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून गरीब रुग्णांच्या सेवेसाठी काम करीत असलेल्या ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या पुढाकाराने हे चित्र काही प्रमाणात तरी पालटले आहे. या संस्थेने फुटपाथवरील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था केली आहे.
सध्या संस्थेच्या इमारतीमध्ये ७५ रुग्ण राहत असून त्यांच्यासोबत त्यांचे दोन नातेवाईक राहतात. या वेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कमी किंमतीत जेवणाची सोयही करण्यात आली आहे. पाच रुपये नाश्ता आणि दहा रुपये जेवण असल्यामुळे बाहेर वडापाव खाऊन पोटभरणाऱ्या नातेवाईकांना येथे पोटभर जेवण करता येते. एका वेळी या संस्थेत २२१ जण राहू शकतात. मात्र फुटपाथवर राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इतर गरजूंना मदत मिळावी यासाठी संस्था किमान एक महिना राहण्याची सोय करू शकतो. आताही प्रतीक्षा यादी खूप मोठी असल्याने सर्वच गरजूंना ही संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. मात्र जागेअभावी आम्हाला ते शक्य नसल्याचे या संस्थेच्या अलका सावरकर यांनी सांगितले. येथे राहत असताना धूम्रपान आणि दारू पिण्यास बंदी असून यासाठी दररोज खोल्यांची तपासणी केली जाते. त्याबरोबरच खोल्याची आणि अन्नाची स्वच्छता याचीही काळजी घेतली जाते असल्याचेही सावरकर यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त नाना पालकर स्मृती समितीच्या अंतर्गत मुंबईतील अनेक रुग्णालयात असे अनेक उपक्रम राबविले जातात.व त्याचबरोबर संस्थेत डायलेसिस सेवा, योग, क्षयरोग तपासणी यांसारख्या सोयी कमी किमतीत दिल्या जातात. भविष्यात अशा गरजूंना उपयुक्त उपक्रम सुरू करण्याची इच्छा असल्याचेही सावरकर यांनी नमूद केले. ही संस्था परळमध्ये स्थित असून टाटा कॅन्सर किंवा इतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाइकांसाठी येथे राहण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून त्यानंतर महिन्याभरात जागा रिकामी झाल्यास नोंदणी केलेल्या रुग्णांशी संपर्क साधला जातो. नाना पालकर स्मृती समिती, परळ. संपर्क- ०२२२४१६४८९०.